राष्ट्रीय

Shradha Murder Case : पॉलिग्राफ चाचणीत आफताबला विचारले 50 हून अधिक प्रश्न

मोहन कारंडे

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : श्रद्धा वालकरच्या हत्या प्रकरणातील आरोपी आफताब पूनावालावर पॉलिग्राफ चाचणीत 50 हून अधिक प्रश्न विचारण्यात आल्याचे समोर आले. बालपणापासून ते श्रद्धाच्या खुनासंदर्भातील बारीकसारीक तपशील जाणून घेणारे हे प्रश्न होते, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.

देशाला हादरवणार्‍या श्रद्धा खून प्रकरणात सज्जड पुरावे गोळा करण्याचे अवघड काम पोलिसांना करावे लागत असून, त्यासाठी आफताबला तोंड उघडायला लावून सविस्तर माहिती गोळा केली जात आहे. त्याने कबुलीजबाब दिला असला, तरी घटनाक्रमातील प्रत्येक बारकावा दहादा तपासला जात आहे. त्याचसाठी आफताबची नार्को चाचणी आणि पॉलिग्राफ चाचणी घेण्याचा निर्णय झाला. त्यानुसार आधी पहिली पॉलिग्राफ चाचणी घेतली गेली. याचा काही तपशील पोलिसांनी सांगितला असून, त्यानुसार पोलिसांनी वैद्यकीय अधिकारी व न्यायवैद्यक अधिकार्‍यांच्या साक्षीने त्याला 50 हून अधिक प्रश्न विचारले. बालपण, शिक्षण, नोकरी आणि श्रद्धासोबच्या संबंधांवर प्रश्न होतेच; पण श्रद्धाच्या खुनाबाबत सविस्तर जाणून घेण्यात आले. खून करण्याचे नेमके कारण काय, खून कसा आणि किती वाजता केला, कोणती हत्यारे वापरून तिचे तुकडे केले व ते तुकडे कसे व कुठे फेकले, फोन, हत्यारे कुठे आहेत आदी प्रश्न पोलिसांनी विचारले. आफताबने हिंदीत विचारलेल्या या प्रश्नांना इंग्रजीत उत्तरे दिली. त्याच्या उत्तरांचे विश्लेषण केले जात असून, त्यातून आणखी काही धागेदोरे हाती लागण्याची पोलिसांना आशा आहे.

SCROLL FOR NEXT