नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निर्देशानुसार शौर्य पाटील आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. एसआयटीचे नेतृत्व सहाय्यक पोलीस आयुक्त रमेश लांबा करतील, तर पोलीस उपायुक्त आदित्य गौतम आणि उपनिरीक्षक रोहित कुमार हे या पथकात असणार आहेत.
मागील महिन्यात नवी दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेत शिकणाऱ्या शौर्य पाटील नामक मराठी विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. त्यानंतर सातत्याने विविध स्तरावर या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. काही दिवसांपुर्वीच सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील खासदारांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या शिष्टमंडळातील निलेश लंके यांनी या प्रकरणाची चौकशी गतीने करण्याची मागणी केली होती. त्यानंतर गृहमंत्र्यांनी एसआयटी स्थापन करण्याचे निर्देश दिले आणि त्यानुसार एसआयटी स्थापन करण्यात आली. दरम्यान, मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनीही शौर्य पाटील यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती.