पुढारी ऑनलाईन डेस्क : पतीला हार्ट अटॅक आल्याचा बनाव करून पत्नीनेच त्याची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील बिजनोर जिल्ह्यामधील नजीबाबाद येथे घडली. पतीचा शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर पत्नीचे बिंग फुटले. या घटनेमुळे पोलिसही चक्रावून गेले आहेत. खूनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिस या संदर्भात अधिक तपास करत आहेत. अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. (Bijnor Murder Case)
उत्तर प्रदेशातील बिजनोर जिल्ह्यातील नजीबाबाद येथील आदर्श नगर कॉलनी २९ वर्षीय दीपक कुमार हा पत्नी शिवानी व एक वर्षाचा मुलगा वेदांत यांच्याबरोबर भाड्याच्या खोलीत राहत होता. दीपक कुमार याचा ४ एप्रिलला घरात संशयास्पद मृत्यू झाला होता. याप्रकरणी नातेवाईकांनी पोलिसांना याची माहिती दिली होती. पोलिसांनी चौकशी केली असता पत्नी शिवानी हिने आपल्या पतीचा मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याचे पोलिसांना सांगत पोलिसांची दिशाभूल केली होती. आठ दिवसांनी दीपकच्या शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर पोलिसाही चक्रावून गेले. या अहवालातून दीपकची गळा दाबून हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली. त्यानंतर नातेवाईकांच्या चौकशीदरम्यान संशयाची सुई पत्नी शिवानीकडेच फिरत असल्याने पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन कसून तिची उलट चौकशी केली. या चौकशीदरम्यान तिने आपणच गळा दाबून पतीची हत्या केल्याची कबुली दिली. (Bijnor Murder Case)