Ear to Nose Wire Viral Video: सोशल मीडियावर सध्या एक विचित्र पण तितकाच चर्चेत असणारा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक लोक अक्षरशः थक्क झाले आहेत. कारण या व्हिडिओत एक मुलगा थेट आपल्या कानात तार घालतो आणि काही सेकंदांत तीच तार नाकातून बाहेर काढतो. हे दृश्य पाहून अनेकांना आपल्या डोळ्यांवरच विश्वास बसत नाही.
व्हिडिओत सुरुवातीला मुलगा एक लांब तार हळूहळू कानात घालताना दिसतो. नेमकं तो काय करतोय, हे आधी लक्षातच येत नाही. पण काही क्षणांतच सगळा प्रकार दिसतो. कानात घातलेली तार तो थेट नाकातून बाहेर काढतो. हा प्रकार पाहून अनेक जण हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहत आहेत. “हे कसं शक्य आहे?” असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. काहींना हा प्रकार जादूच्या खेळासारखा वाटतोय, तर काहींना तो थोडासा भीतीदायकही वाटतोय.
हा व्हिडिओ X (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @manz39754 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “टॅलेंटला मर्यादा नसते. कानात घाला, नाकातून काढा. मुलात गजबचं टॅलेंट आहे,” असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलं आहे. अवघ्या 17 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 51 हजारांहून अधिक वेळा पाहिला असून, शेकडो लोकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
प्रतिक्रियांमध्येही मजेशीर आणि शंका व्यक्त करणाऱ्या दोन्ही प्रतिक्रिया दिसतात. कुणी म्हणतं, “असं टॅलेंट पहिल्यांदाच पाहतोय,” तर कुणी थेट चिंता व्यक्त करत, “याच्या कानाचा पडदा फाटलेला तर नाही ना?” असा सवाल उपस्थित केला आहे.
दरम्यान, एका युजरने थेट Grokकडे या व्हिडिओबाबत विचारणा केली. त्यावर Grok ने सांगितलं की, “हा व्हिडिओ खऱ्या अर्थाने शारीरिक कसरत नसून एक जादूची ट्रिक असण्याची शक्यता जास्त आहे. मानवी शरीररचनेनुसार कान आणि नाक थेट जोडलेले नसतात. त्यामुळे अशी तार प्रत्यक्षात कानातून नाकात जाणं शक्य नाही. ही ‘स्लाइट ऑफ हॅन्ड’ म्हणजेच हातचलाखी असू शकते, जिथे तार आधी तोंडात लपवून नंतर नाकातून काढली जाते.”