नवी दिल्ली : शिवसेना ठाकरे गटाने बोलावलेल्या संसदीय पक्षाच्या बैठकीला ९ पैकी ६ लोकसभा सदस्यांनी दांडी मारली. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वीपणे पार पाडल्याचे शिक्कामोर्तब झाले. यासाठी आवश्यक कारवाई बुधवारी रात्रीच शिंदेंच्या शिवसेनेने पूर्ण केल्याचे समजते. पक्षाच्या वर्धापनदिनी किंवा पुढच्या दोन दिवसांत यासंदर्भातील अधिकृत घोषणा होऊ शकते. ज्या खासदारांच्या काही अडचणी होत्या, त्यावरही एकनाथ शिंदेंनी यशस्वी तोडगा काढल्याचे समजते. दरम्यान, ठाकरे गटाच्या संसदीय बैठकीला जे अनुपस्थित होते, त्यांना ठाकरे गटाने ‘कारणे दाखवा’ नोटीस जारी केली असून ७ दिवसांत उत्तर मागितले आहे. बैठकीला अनुपस्थित खासदारांवर काय कायदेशीर कारवाई करता येईल, याची पडताळणीही त्यांनी केली आहे.
‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर गुरुवारीदेखील दिल्लीत वेगवान घडामोडी झाल्या. शिवसेना ठाकरे गटाने संसदीय पक्षाची बैठक संसदेतील कार्यालयात बोलवली होती. या बैठकीसाठी पक्षाच्या वतीने व्हिप जारी करण्यात आला होता. मात्र तो झुगारून ठाकरेंचे ६ खासदार बैठकीला अनुपस्थित राहिले. गुरुवारी बोलावलेली ही बैठक एक तासाहून अधिक काळ चालली. मात्र यामध्ये बंडखोर गट म्हणून चर्चेत असलेले संजय देशमुख, संजय जाधव, संजय दिना पाटील, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे फिरकलेसुद्धा नाहीत. या बैठकीला केवळ संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे उपस्थित होते. या बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या खासदारांना पक्षाने नोटीस बजावली असून ७ दिवसांत उत्तर मागितले आहे. बैठकीला जे उपस्थित राहतील ते खरे शिवसैनिक आहेत. बाकी सगळे ‘गद्दार’ आहेत, अशी प्रतिक्रिया बैठकीपूर्वीच संजय राऊत यांनी दिली.
६ खासदार दिल्लीतून जयपूरला
सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेना ठाकरे गटातील सहा बंडखोर खासदार बुधवारी मध्यरात्रीपर्यंत दिल्लीत होते. मात्र बुधवारच्या मध्यरात्री त्यांना जयपूर येथील एका खासगी ठिकाणी ठेवण्यात आले. जयपूरमधूनच हे सर्व खासदार शनिवारी (२० जून) थेट मुंबईला रवाना होण्याची शक्यता आहे. संसदीय पक्षाच्या बैठकीच्या आदल्या दिवशी खासदारांना जयपूरला हलवण्याचे कारण समोर आले. खासदार दिल्लीत राहिले तर राज्यात त्यांच्या विरुद्ध होत असलेला आक्रोश आणि भावनिक साद यामुळे मनपरिवर्तन होऊन एखादा खासदार बैठकीला हजर राहिला तर आयत्या वेळी अडचण होऊ नये म्हणून हा खबरदारीचा उपाय केल्याचे समजते.
प्रतीक्षा एकत्रित फोटोची
‘ऑपरेशन टायगर’अंतर्गत ठाकरे यांच्या सेनेचे सहा खासदार शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाल्याचे समजते. मात्र अद्याप या सहा खासदारांनी मिळून लोकसभा अध्यक्षांना पत्र देतानाचा फोटो किंवा ते पत्रही कुठे जाहीर झालेले नाही. सोबतच सहा खासदारांनी एकनाथ शिंदे किंवा डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्याचाही फोटो कुठेही जाहीर झाला नाही. हे फोटो बाहेर येऊ नयेत, याची पूर्ण खबरदारी घेतल्याचे समजते. मात्र येत्या दोन दिवसांत हे बहुप्रतीक्षित सगळे फोटो माध्यमांसमोर येणार असल्याची समजते. दोन दिवसांनी एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर गटातील सर्व सहा खासदार पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे.
‘त्या’फोन कॉलवर खासदार झाले तयार
लोकसभा अध्यक्षांना दिल्या जाणाऱ्या पत्रावर स्वाक्षरी करण्यापूर्वी काही खासदारांनी भविष्याची कैफियत एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडली होती. त्यामुळे गट म्हणून आवश्यक असलेले आकडे जुळत नव्हते. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकनाथ शिंदे यांनी स्वतः सर्व खासदारांशी संवाद साधून तुमच्या सगळ्या अडचणींमधून मार्ग काढण्यात आलेला आहे, असा शब्द दिला आणि नंतरचा सगळा मार्ग मोकळा झाला, असेही सूत्रांनी सांगितले.