Shiv Sena Party Symbol Case Pudhari
राष्ट्रीय

Shivsena Party symbol case : शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला लवकरच! ३० ऑक्टोबरपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याचे सुप्रीम कोर्टाचे संकेत

या प्रकरणाची पुढील सुनावणी १३ ऑक्टोबरला

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्हावरील वादाचा निकाल कधी लागणार, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले असताना सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या सुनावणीबाबत महत्त्वाचे संकेत दिले आहेत. येत्या ३० ऑक्टोबरपर्यंत या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करण्याचे न्यायालयाने सूचित केल्याचे समजते. त्यामुळे दिवाळीपूर्वी शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हासंदर्भातील कायदेशीर लढाईतील सुनावणीचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण होण्याची शक्यता आहे.

मात्र, सुनावणी पूर्ण होणे म्हणजे त्याच दिवशी अंतिम निकाल लागेल असे नाही, यात आणखी काही वेळ जाऊ शकतो. दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी १३ ऑक्टोबरला आहे.

एकनाथ शिंदे यांनी २०२२ मध्ये शिवसेनेत बंड केल्यानंतर पक्षात उभी फूट पडली. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटांमध्ये पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्हावरून संघर्ष सुरू झाला. केंद्रीय निवडणूक आयोगाने फेब्रुवारी २०२३ मध्ये शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिले. या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यामुळे न्यायालयाच्या अंतिम निर्णयाला राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले आहे.

निवडणूक आयोगाची बाजू पुढील आठवड्यात

सर्वोच्च न्यायालयात सध्या या प्रकरणाची अंतिम सुनावणी सुरू आहे. उपलब्ध माहितीनुसार, पुढील आठवड्यात निवडणूक आयोगाच्या वतीने युक्तिवाद केला जाणार आहे. त्यानंतर तिसऱ्या आठवड्यात उद्धव ठाकरे गटाला प्रत्युत्तरादाखल आपली बाजू मांडण्याची संधी मिळणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण करून ३० ऑक्टोबरपर्यंत सुनावणी संपवण्याचे न्यायालयाचे नियोजन असल्याचे समजते.

शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची (एसआयआर) सुनावणी लवकर घेण्याची विनंती करण्यात आली. त्यावेळी शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या प्रकरणाची सुनावणी ३० ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे न्यायालयाने सूचित केले. त्यानंतर पश्चिम बंगालमधील एसआयआर प्रकरणाच्या सुनावणीला वेळ देण्याचा मुद्दा पुढे येऊ शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT