नवी दिल्ली, | मनरेगा योजनेच्या मुद्द्यावरुन काँग्रेस केंद्र सरकारवर हल्लाबोल करत असताना केंद्रीय ग्रामीण विकास, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शनिवारी विरोधी पक्षावर पलटवार केला. काँग्रेसच्या राजवटीत मनरेगा योजना भ्रष्टाचारात बुडाली होती. आता, संपूर्ण पारदर्शकतेने, आम्ही विकासित भारत-जी राम जी योजना Guarantee for Rozgar and Ajeevika Mission (Gramin) सुरू केली आहे, जी देशभरातील कामगारांना खऱ्या अर्थाने लाभ देईल. तसेच कामगार आणि खेड्यांना अधिक सक्षम केले, असे कृषी मंत्री म्हणाले. ग्रामीण रोजगार, कामगार आणि त्यांच्या हक्कांच्या संरक्षणाबाबत काँग्रेससह विरोधकांकडून पसरवलेला गोंधळ पूर्णपणे निराधार आणि दिशाभूल करणारा आहे, असे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने विकासित भारत-जी राम जी योजनेद्वारे ग्रामीण भारत आणि कामगारांचे हक्क कमकुवत केले नाहीत, असे शिवराज सिंह यांनी सांगितले. काँग्रेस निवडणुकीच्या फायद्यासाठी महात्मा गांधींचे नाव वापरत होती.मनरेगा बजेट वारंवार कमी करणारे काँग्रेस नेते आज मगरीचे अश्रू ढाळत आहेत, असे शिवराज सिंह म्हणाले. "विकसित भारत - जी राम जी" मध्ये महिला, बचत गट आणि ग्रामीण समुदायांच्या सहभागाला प्राधान्य देण्यात आले आहे.
व्हीबी-जी रामजी कायद्याअंतर्गत, ग्रामीण कुटुंबांना १०० ऐवजी १२५ दिवसांची वैधानिक रोजगार हमी दिली जात आहे, ज्यामुळे कामगारांना अधिक दिवस सुरक्षित रोजगार मिळेल, असे ते म्हणाले. रोजगार सुरक्षा कमी केली जात आहे असा दावा करून विरोधक जनतेची दिशाभूल करत आहेत, तर कायद्यातील तरतुदी स्पष्टपणे दर्शवितात की रोजगार सुरक्षा कमी केली गेली नाही, तर वाढवली गेली आहे.