पुढारी ऑनलाईन डेस्क : NDA Cabinet : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 9) तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यानंतर दुस-याअ दिवशी मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर करण्यात आले. यात मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे कृषी आणि शेतकरी कल्याण आणि पंचायत आणि ग्रामीण विकास मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.
लखनौमधून सातत्याने खासदार होत असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांच्याकडे पुन्हा एकदा संरक्षण खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
निर्मला सीतारामन यांच्याकडे पुन्हा अर्थ मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.
हिंदुस्थान अवाम मोर्चाचे एकमेव खासदार आणि मोदी मंत्रिमंडळातील सर्वात ज्येष्ठ सदस्य (79) जीतन राम मांझी यांच्याकडे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. शोभा करंदलाजे यांना या खात्यात राज्यमंत्री करण्यात आले आहे.
मनोहर लाल खट्टर यांना ऊर्जा मंत्रालय देण्यात आले आहे. यासोबतच त्यांना नगरविकास मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. खट्टर हे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री असून त्यांनी पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवून विजय मिळवला आहे. श्रीपाद नाईक यांची या खात्यांच्या राज्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपाचे नितीन गडकरी यांना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर हर्ष मल्होत्रा परिवहन राज्य मंत्री असणार आहेत. अमित शाह यांच्याकडे गृह खाते सोपवण्यात आले आहे. एस जयशंकर हे पुन्हा परराष्ट्र खातं सांभाळतील.