नवी दिल्ली : दिल्ली सरकार शेतकऱ्यांसाठी केंद्राच्या योजना राबवत नसल्याचा आरोप केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केला. त्यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांना पत्र लिहीले आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिले की, माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील शेतकरी बंधू-भगिनींचा विश्वासघात केला आहे. केजरीवाल यांनी सरकारमध्ये येताच जनतेचे निर्णय घेण्याऐवजी आपले रडगाणे सुरू ठेवले. याला प्रत्युत्तर देताना दिल्लीच्या आतिशी म्हणाल्या की, भाजपने शेतकऱ्यांबद्दल बोलणे म्हणजे दाऊदने अहिंसेचा उपदेश दिल्यासारखे आहे.
केंद्रीय कृषीमंत्री म्हणाले की, दिल्लीतील शेतकरी मला भेटलो असून त्यांना अनेक योजनांचा लाभ मिळत नाही. दिल्ली सरकारमध्ये शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती नाही दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे कधीही योग्य निर्णय घेतले नाहीत. केंद्र सरकारच्या शेतकरी हिताच्या योजनाही ‘आप’ सरकारने दिल्लीत राबविणे बंद केले आहे. आज दिल्लीचे शेतकरी बंधू-भगिनी चिंतेत आहेत, असे त्यांनी पत्रात लिहीले आहे.
दिल्ली सरकार केंद्राच्या अनेक शेतकरी कल्याणकारी योजना राबवत नसल्यामुळे शेतकरी बंधू-भगिनी या योजनांच्या लाभापासून वंचित राहत आहेत. 'आप'ची धोरणे कृषी आणि शेतकरीविरोधी आहेत, असे त्यांनी लिहीले आहे. दिल्लीतील शेतकऱ्यांनी मला सांगितले आहे की, दिल्लीत ट्रॅक्टर, हार्वेस्टर यासारख्या आवश्यक कृषी उपकरणांची व्यावसायिक वाहन श्रेणीत नोंदणी केली जात असल्याने शेतकऱ्यांना त्यांची कृषी उपकरणे चढ्या भावाने खरेदी करावी लागत आहेत, असे चौहान म्हणाले. दिल्लीत सध्या शेतकऱ्यांकडून विजेसाठी व्यावसायिक दर आकारले जात आहेत. सिंचन आणि इतर शेतीच्या कामांसाठी स्वस्त वीज आवश्यक असते, मात्र दिल्लीत कृषी विजेसाठी शेतकऱ्यांकडून मोठी रक्कम घेतली जात आहे, असा दावा त्यांनी केला आहे.
शिवराज सिंह चौहान यांच्या पत्रावर दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी म्हणाल्या की, भाजपने शेतकऱ्यांबद्दल बोलणे म्हणजे दाऊदने अहिंसेचा उपदेश दिल्यासारखे आहे. पंजाबमध्ये शेतकरी आमरण उपोषणाला बसले आहेत, पंतप्रधान मोदी यांना त्यांच्याशी बोलण्यास सांगा. शेतकऱ्यांवर राजकारण करणे बंद करा, कारण भाजपच्या काळात शेतकऱ्यांवर लाठ्या-गोळ्या झाडल्या गेल्या, असे आतिशी म्हणाल्या.