नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयांमध्ये बनावट औषधे खरेदी प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी कॉंग्रेसचे लातूरचे खासदार शिवाजी काळगे (Shivaji Kalge) यांनी लोकसभेत केली. शून्य प्रहर दरम्यान त्यांनी या चौकशीची मागणी लोकसभेत केली.
राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये बनावट औषधांची खरेदी करण्यात आली असल्याचे राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी नुकतेच सांगितले आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. सामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार आहे. केंद्र सरकारने याची चौकशी करावी आणि यात दोषी असलेल्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी खासदार काळगे यांनी केली.