नवी दिल्ली; वृत्तसंस्था : ज्या अतिरेक्यांनी पहलगाममध्ये अंदाधुंद गोळीबार केला, त्यांना पकडून ओळख पटवून मारा तसेच देशांतर्गत सुरक्षा वाढवा. देशाच्या सीमेवरील नागरिकांना सुरक्षा द्या, अशा महत्त्वाच्या दोन मागण्या शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आला. केंद्र सरकारने ‘ऑपरेशन सिंदूर’विषयी माहिती देण्यासाठी गुरुवारी सर्वपक्षीय बैठक घेतली. त्यावेळी ठाकरे गटाने या मागण्या मांडल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे या बैठकीत सहभागी झाले होते. अध्यक्षस्थानी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह होते.
बैठकीपूर्वी काँग्रेसने पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीची मागणी केली होती. मात्र ते उपस्थित राहिले नाहीत. यावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्पष्ट केले की, संकटाच्या काळात आम्ही देश आणि सरकारसोबत आहोत. सरकारवर कोणतीही टीका करणार नाही.
या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने संजय राऊत देखील उपस्थित होते. या बैठकीनंतर राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत म्हणाले की, केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. यात आम्ही काही सूचना केल्या आहेत. यातील पहिली म्हणजे ज्या 6 अतिरेक्यांनी अंदाधुंद गोळीबार करत आमच्या माता-भगिनींचे सिंदूर पुसले, ते अतिरेकी पकडत नाही तोपर्यंत ऑपरेशन संपले, असे म्हणता येणार नाही. या 6 अतिरेक्यांना पकडून इंडिया गेटसमोर आणले पाहिजे. कुटुंबीय गमावलेल्या महिलांकडून त्यांची ओळख पटवली पाहिजे आणि त्यानंतर त्यांना मारून पाकमध्ये फेकले पाहिजे. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये 100 दहशतवादी तर नक्कीच मारले आहेत. पूर्ण पडताळणी होईल तेव्हा हा आकडा वाढू शकेल. गृहमंत्री म्हणून अमित शहा यांनी देशांतर्गत सुरक्षेला प्राधान्य द्यावे, सर्व महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था मजबूत करावी.
या सर्वपक्षीय बैठकीत पाकिस्तानला दिलेल्या प्रत्युत्तराबाबत केंद्र सरकारने म्हटले की, ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये 100 हून अधिक दहशतवादी ठार झाले आहेत. ही कारवाई सुरू आहे, त्यामुळे अचूक संख्या सांगणे कठीण होत आहे. जोपर्यंत पाकिस्तान कोणतीही चिथावणीखोर कारवाई करत नाही तोपर्यंत भारत त्यांच्याकडून कोणतीही कारवाई करणार नाही.