Srirang Barne Lok Sabha
नवी दिल्ली : पुण्यातील नवले पुलाला उच्च दुर्घटना क्षेत्र घोषित करा, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत केली. मागील काही दिवसांत सातत्याने नवले पुलावर होत असलेले अपघातांचे पडसाद संसदेतही उमटले.
लोकसभेत शून्य प्रहरात बोलताना खासदार बारणे यांनी नवले पुलाचा प्रश्न उपस्थित केला. मागील काही दिवसांमध्ये सातत्याने नवले पुलावर मोठे अपघात होत आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना बारणे यांनी नवले पुलाचे सेफ्टी ऑडिट करण्यात यावे, सोबतच या पुलासह एक सर्विस रोड तयार करण्यात यावा, अशा मागण्या केल्या.
दरम्यान, नवले पूल परिसरात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने लागू केलेल्या 30 किमी प्रतितास वेगमर्यादेच्या निर्णयाला वाहन चालकांकडून तीव्र विरोध होत आहे. हा निर्णय सुरक्षेसाठी घेतला असला तरी, तीव्र उतारावर जड मालवाहतूक ट्रकना इतक्या कमी वेगाने चालवणे म्हणजे ‘बेक फेल’ला आमंत्रण असल्याचा गंभीर सवाल वाहतूकदारांनी उपस्थित केला आहे.
स्वामीनारायण मंदिर ते नवले पूल यादरम्यान 30 किमी प्रतितास ही वेगमर्यादा मालवाहतूकदारांसाठी नवी डोकेदुखी ठरत आहे. वाहतूकदारांच्या म्हणण्यानुसार, तीव उतारावर 30 किमी प्रतितास वेगाने वाहन चालविण्यासाठी चालकाला बेकचा अतिरिक्त वापर करावा लागतो. यामुळे बेक ड्रम गरम होऊन ते निकामी होण्याची (बेक फेल) शक्यता वाढते तसेच टायरला आग लागण्याचा धोकाही वाढतो.