नवी दिल्ली : 'जय भवानी जय शिवाजी'चा जयघोष, असंख्य शिवप्रेमींची उत्साही उपस्थिती, ढोलताशांचा गजर, शाहिरी पोवाड्यांसह निनादणाऱ्या तुताऱ्या, भारतीय सेनेची अनोखी मानवंदना अशा अत्यंत उत्साही वातावरणात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरी झाली. संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखालील शिवजयंती राष्ट्रोत्सव समितीतर्फे दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात शिवजयंती सोहळा झाला. या सोहळ्यासाठी संभाजीराजे छत्रपती सहकुटूंब उपस्थित होते. मेजर जनरल एस. एस. पाटील यांची यावेळी विशेष उपस्थिती होती. खासदार राजाभाऊ वाझे यांच्यासह अन्य मान्यवरही उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी दिल्लीतील मराठी बांधवांसोबतच महाराष्ट्रातील विविध भागातून शिवप्रेमी पोहोचले होते. या सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली अर्पण करण्यात केली. नाशिकच्या शिवराय ढोल पथकातर्फे सादरीकरण करण्यात आले. यानिमित्त सदनाच्या प्रांगणातील शिवाजी महाराजांच्या सिंहासनारुढ पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करण्यात आली.
महाराष्ट्र सदनाच्या मुख्य प्रवेश भागातील मध्यस्थानी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा स्थापन करण्यात आली होती. या विशेष कार्यक्रमात संभाजीराजे छत्रपती, संयोगिताराजे छत्रपती यांनी पाळणा पूजन केले. त्यानंतर पालखी पूजनही झाले. सदनाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला संभाजीराजे छत्रपती यांच्यासह मान्यवरांनी अभिवादन केले. या ठिकाणी भारतीय सेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथमच विशेष मानवंदना देण्यात आली. यानिमित्ताने महाराष्ट्र सदनाचा सबंध परिसर फुलांनी सजविण्यात आला होता. दिल्लीतील मराठीजन मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते.
नाशिकच्या ढोल ताशांच्या पथकानेही या कार्यक्रमात सादरीकरण केले. या गजराने सदनाचे वातावरण दुमदुमले. ढोल पथकातील सहभागी तरुणाईचा उत्साह आणि सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. मानवंदनाच्या कार्यक्रमानंतर द फोक आख्यान हा कार्यक्रम सादर करण्यात आला.
संसद भवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास विविध मान्यवरांसह शिवप्रेमींकडून अभिवादन करण्यात आले. खासदार अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे, भास्कर भगरे, माजी खासदार हेमंत गोडसे आदींची यावेळी उपस्थिती होती. येथेही ढोलताशा पथकाद्वारे मानवंदना देण्यात आली.