नवी दिल्ली : निवडणूक आयोगाशी संबंधित खळबळजनक माहिती समोर आल्यानंतर निवडणूक आयोगाने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावर काँग्रेस नेते शशी थरूर यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे आता थरूर यांच्या प्रश्नांना आयोग उत्तरे देणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
काय आहे प्रकरण?
निवडणूक आयोगातील निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी गेल्या दहा महिन्यांत आयोगाच्या विविध निर्णयांवर किमान १४ वेळा आक्षेप नोंदवल्याचे एका इंग्रजी वृत्तपत्राच्या बातमीतून समोर आले होते. हे आक्षेप नवीन मतदारांच्या नोंदणीसाठीच्या फॉर्म ६ मधील बदल, मतदारांची नावे वगळणे व पुन्हा समाविष्ट करणे, मतदार यादीच्या डेटाबेसवरील नियंत्रण आणि माहिती-तंत्रज्ञान यंत्रणेशी संबंधित असल्याचे वृत्त आहे. गोव्यात ९७ मतदारांची नावे पुन्हा समाविष्ट करण्याच्या प्रक्रियेत तांत्रिक अडचणी आल्याचा मुद्दाही या वृत्तातून समोर आला. या वृत्तानंतर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण देताना अंतर्गत निरीक्षणे आणि वेगवेगळी मते ही कोणत्याही संस्थेच्या निर्णय प्रक्रियेचा भाग असल्याचे म्हटले. तसेच, एसआयआरसह आयोगाचे सर्व निर्णय तिन्ही आयुक्तांच्या संमतीने आणि एकमताने झाल्याचे आयोगाने स्पष्ट केले.
या खुलाशानंतर काँग्रेस नेते शशी थरूर यांनी आयोगासमोर काही प्रश्न उपस्थित केले. "नोंदवण्यात आलेले १४ आक्षेप नेमके कोणते होते आणि त्यापैकी प्रत्येकावर काय निर्णय झाला? फॉर्म ६ मधील बदलांचा कायदेशीर आधार काय होता? मतदार यादीच्या डेटाबेसच्या केंद्रीकृत नियंत्रणाबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांचे काय झाले? गोव्यातील ९७ मतदारांच्या प्रकरणात नेमकी प्रक्रिया काय झाली? तसेच या मतदारांची नावे पुन्हा समाविष्ट करण्यासंदर्भातील अपिलांना मंजुरी कोणी दिली आणि कोणत्या प्रक्रियेनुसार दिली?" अशी विचारणा थरूर यांनी केली आहे.
कॅबिनेट सचिवांशी झालेल्या पत्रव्यवहाराची पार्श्वभूमी काय होती आणि आयोगाच्या आवश्यक मंजुरीशिवाय आयोगाच्या नावाने कोणता पत्रव्यवहार झाला होता का, याचेही स्पष्टीकरण देण्याची मागणी त्यांनी केली. अंतिम निर्णय एकमताने झाल्याचे सांगणे आणि निर्णय प्रक्रियेदरम्यान नोंदवलेल्या आक्षेपांवर नेमकी काय कार्यवाही झाली हे स्पष्ट करणे, या दोन्ही स्वतंत्र बाबी असल्याचे थरूर यांनी म्हटले आहे.