शशी थरूर Pudhari File Photo
राष्ट्रीय

Shashi Tharoor | शशी थरूर काँग्रेसच्या किती दूर, किती जवळ?

पुढारी वृत्तसेवा

प्रशांत वाघाये, नवी दिल्ली

काँग्रेस नेते आणि खासदार शशी थरूर हे सध्या वेगवेगळ्या निमित्ताने चर्चेत आहेत. शशी थरूर काँग्रेस पक्ष सोडतील का, थरूर भाजपमध्ये प्रवेश करतील का, एवढेच नव्हे तर थरूर भाजपमध्ये जाऊन केंद्रीय परराष्ट्र मंत्री होतील का, अशा चर्चा राष्ट्रीय राजधानीत रंगत आहेत. मात्र, यातला कळीचा मुद्दा म्हणजे शशी थरूर काँग्रेसच्या किती दूर आणि किती जवळ आहेत, हा आहे.

शशी थरूर 2009 साली पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले. त्यानंतर ते डॉ. मनमोहन सिंग सरकारमध्ये केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री होते. सध्या ते काँग्रेसच्या कोट्यात असलेल्या संसदेच्या परराष्ट्र समितीचे अध्यक्ष आहेत. थोडे मागे वळून बघितले तर त्यांनी विद्यमान काँग्रेस अध्यक्ष खरगे यांच्याविरुद्ध काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूकही लढवली होती. काँग्रेस हा लोकशाही मानणारा पक्ष आहे, अशी स्तुतिसुमने देशभर त्यांनी आपल्या पक्षावर उधळली होती. हा झाला भूतकाळ. मात्र, आता त्यांचा तोच लोकशाही मानणारा पक्ष त्यांच्यावर वक्रद़ृष्टी ठेवून आहे की काय, असे चित्र आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, माध्यम सरचिटणीस जयराम रमेश यांनी तर नाव न घेता थरूर यांच्यावर टीकाही केली.

पहलगाम दहशतवादी हल्ला झाल्यानंतर ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले. त्यानंतर भारताने जगभरात वेगवेगळ्या देशांमध्ये आपले शिष्टमंडळ पाठवले. यातील एका शिष्टमंडळाचे नेतृत्व थरूर यांनी केले. त्यानंतर त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यामुळे काँग्रेस पक्ष त्यांच्या भूमिकांकडे संशयास्पद नजरेने पाहत आहे. थरूर यांच्या या सगळ्या वागणुकीला काही महिन्यांनी होणार्‍या केरळ विधानसभा निवडणुकीची किनार आहे. या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला तिथे चांगली परिस्थिती राहील अशी शक्यता आहे. त्यामुळे थरूर यांच्यासह काँग्रेसचे संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, राष्ट्रीय सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला हेही याच निवडणुकीकडे लक्ष ठेवून आहेत. दरम्यन, थरूर वेगवेगळ्या माध्यमातून आपले मूल्य दाखवण्याचा प्रयत्न करताहेत. हे मूल्य उपयुक्तता मूल्य आहे की उपद्रवमूल्य, येणारा काळच सांगेल.

काँग्रेसमध्ये राहून काहीसा दुरावा

काँग्रेसमध्ये अनेक वेळा पक्षांतर्गत वादावर काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने लक्ष घातले व त्याच्यावर फुंकर घातली गेली. कर्नाटक, राजस्थानमध्ये असे झाल्याचे आपण पाहिले; मात्र या राज्यांचे वाद वाद हे पक्षांतर्गत होते. तर थरूर यांचे वक्तव्य हे पक्षाच्या पलीकडे जाऊन काँग्रेसच्या विरोधकांना पोषक ठरते. त्यामुळे थरुर काँग्रेसमध्येच असले तरी काँग्रेसच्या काहीसे दूर गेल्याचे दिसून येते. पक्षात गरजेपेक्षा जास्त लोकशाही दाखवून थरूर यांनी सचिन पायलट होण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र तो पुरता फसल्याचे दिसून येते. त्यामुळे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री असलेले थरूर यांचे संवादाचे दोर पक्षाने कापलेले आहेत. यात आता प्रियंका गांधी यांनी लक्ष घातले तरच परिस्थिती बदलू शकते. कारण प्रियंका गांधी यांचा वायनाड लोकसभा मतदारसंघ केरळमध्ये आहे. त्यामुळे केरळ राज्यात काय करायचे याचा निर्णय त्यांना विचारात घेऊन केला जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT