Sharad Pawar meets PM Modi PTI
राष्ट्रीय

Sharad Pawar meets PM Modi: शरद पवारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; सत्तेत सहभागी होणार? नेमकी काय झाली चर्चा?

राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) चे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (दि. २२) संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

मोहन कारंडे

Sharad Pawar meets PM Modi

नवी दिल्ली: राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) चे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (दि. २२) संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या अनपेक्षित भेटीमुळे शरद पवारांचा गट एनडीएसोबत जाण्यासाठी खलबते सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

संसद भवनातील पंतप्रधानांच्या दालनात झालेल्या या भेटीदरम्यान, पंतप्रधान मोदींनी हस्तांदोलन करून शरद पवार यांचे स्वागत केले. त्यांच्या हाताला धरून दालनापर्यंत नेले. त्यांच्यात दीर्घ चर्चा झाल्याचे समजते. मनमोकळेपणाने हसतानाचे त्यांचे फोटो समोर आले आहेत. मात्र त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, याबाबत अद्याप समजले नाही.

दरम्यान, या भेटीच्या आधी (मंगळवारी) शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी जंतर-मंतर येथे जाऊन 'नीट-यूजी' पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि 'सीजेपी'च्या नेतृत्वाखालील आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शविला होता. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्यांचा आवाज दाबण्याऐवजी, सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा संवेदनशीलतेने विचार करावा आणि योग्य ती कारवाई करावी, असे आवाहन त्यांनी केले होते. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीलाही पवारांच्या पक्षाने पाठिंबा दिला आहे.

राष्ट्रवादी एनडीएसोबत युती करणार?

विद्यार्थ्यांशी संबंधित मुद्द्याव्यतिरिक्त, या भेटीमुळे राज्यासह राष्ट्रीय राजकारणात एका मोठ्या बदलाचे संकेत मिळाले आहेत. राज्यात आणि केंद्रात सत्तासहभाग हवा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी एकत्र यावे, असा पर्याय भारतीय जनता पक्षाने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेससमोर ठेवला असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वीच समोर आले होते. मात्र अजित पवार राष्ट्रवादीच्या अध्यक्षा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मात्र या प्रस्तावास विरोध होता.

राजकीय हालचाली पाहता पावसाळी अधिवेशनादरम्यान शरद पवार यांचा पक्ष मोदी सरकारच्या महत्त्वाच्या आणि वादग्रस्त 'मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला' पाठिंबा देऊ शकतो. मागील अधिवेशनात विरोधकांनी एकत्र येऊन या विधेयकाच्या विरोधात मतदान केले होते. जर राष्ट्रवादीने या विधेयकाला पाठिंबा दिला, तर लोकसभेत आवश्यक असलेले दोन-तृतीयांश बहुमत मिळवण्यासाठी मोदी सरकारला मोठी मदत होईल.

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील अलीकडील भेटींनंतरही एनडीएसोबत युती करण्याबाबतच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, सुप्रिया सुळे यांनी एनडीएमध्ये सामील होण्याबाबतच्या अफवा नुकत्याच फेटाळून लावल्या होत्या. त्यांनी स्पष्ट केले होते की, त्यांना किंवा पक्षाच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्याला भाजप किंवा इतर कोणत्याही पक्षाकडून असा कोणताही प्रस्ताव मिळालेला नाही आणि नेत्यांमधील अलीकडील भेटी केवळ प्रशासकीय कामांसाठी होत्या, कोणत्याही राजकीय नव्हत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT