IndiGo Flight Latest News
चंदिगढ : हैदराबादहून चंदिगढला लँड झालेल्या इंडिगोच्या विमानात मोबाइल पॉवर बँकने पेट घेतल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. ३) घडली. चंदिगढ येथील शहीद भगतसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान उतरत असतानाच ही घटना घडली असून या घटनेमुळे विमानात काही काळ प्रचंड गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगोचे विमान (फ्लाईट क्रमांक 6E108) दुपारी ३ वाजून ३२ मिनिटांनी धावपट्टीवर उतरले. विमान धावपट्टीवरुन टर्मिनलच्या दिशेने येताना काही मिनिटांसाठी थांबले होते. ३ वाजून ३५ मिनिटांच्या सुमारास ३९-एफ या सीटवर बसलेल्या देवांश नावाच्या प्रवाशाच्या पॉवर बँकने अचानक पेट घेतला. प्रवाशाने तत्काळ याची कल्पना केबिन क्रू सदस्यांना दिली. या आगीमुळे केबिनमध्ये धूर पसरला आणि आगसदृश परिस्थिती निर्माण झाली. विमान कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत तातडीने अग्निशमन उपकरणांच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवले.
स्फोटामुळे विमानात बसलेल्या प्रवाशांमध्ये घबराट पसरली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वैमानिक आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने आणीबाणीचे द्वार (इमर्जन्सी एक्झिट) उघडले. विमानतळावर सुरक्षितपणे उतरण्यासाठी प्रवाशांची धावपळ सुरू झाली.
या घटनेत पाच प्रवासी किरकोळ जखमी झाल्याचे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इंडिगो एअरलाईन्सने या घटनेबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ‘सर्व प्रवाशांना विमानतळ टर्मिनलपर्यंत सुरक्षितरित्या पोहोचवण्यात आले आहे. प्रवाशांची आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला आम्ही सर्वोच्च प्राधान्य देतो. सुरक्षा तपासणी झाल्यानंतरच विमान पुन्हा झेपावेल', असे इंडिगोने निवेदनात म्हटले आहे.
विमानतळ सुरक्षा यंत्रणा आणि इंडिगो एअरलाइन्सकडून या प्रकरणाची अधिक चौकशी केली जात असून, प्रवाशांना विमानात इलेक्ट्रॉनिक उपकरणे नेताना अधिक खबरदारी घेण्याच्या सूचना पुन्हा एकदा देण्यात येत आहेत.