Seema Haider News
पुढारी ऑनलाईन डेस्क : पतीला सोडून आपल्या चार मुलांसह पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदर हिच्यावर एका अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. सीमाने आरडाओरडा केल्याने कुटुंबातील सदस्यांसह शेजाऱ्यांनी घरात प्रवेश केला व हल्लेखोराला पकडत पोलिसांच्या स्वाधीन केले. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, तेजस असे या हल्लेखोराचे नाव असून तो गुजरातमधून आला आहे. तसेच त्याची मानसिक स्थिती बिघडली असल्याचीही माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी ताब्यात घेऊन हल्लेखोर तेजसची चौकशी केली असता तेजसने सीमा हैदर आणि सचिन मीना या दोघांनी काळी जादू केल्याचा आरोप केला आहे. तेजस हा गुजरातहून बसने येत सीमा हैदरच्या घरी पोहचला. त्यानंतर बंद असलेल्या दाराला लाथ मारली. सीमा हैदरने दरवाजा उघडताच त्याने घरात प्रवेश करत तिला मारहाण केली. त्यानंतर तिचा गळा दाबून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिने आरडाओरडा केल्याने कुटुंबासह शेजाऱ्यांनी तिच्या घराकडे धाव घेतली. त्यानंतर हल्लेखोराच्या तावडीतून तिला सोडवत नागरिकांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
सीमा हैदर आणि सचिन मीणा या दोघांची ऑनलाईन गेम खेळताना ओळख झाली होती. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर आपल्या प्रियकरासाठी पाकिस्तानी सीमा हैदर पतीला सोडून आपल्या चार मुलांसह नेपाळमार्गे भारतात आली होती. हा संपूर्ण प्रकारच संशयास्पद असल्याने उत्तर प्रदेश पोलिसांनी याप्रकरणी सखोल चौकशी सुरु केली होती. तसेच तिच्या हालचालींवरही पोलिसांनी बारिक लक्ष ठेवले होते.