Amit Shah  File photo
राष्ट्रीय

Amit Shah | सीमा सुरक्षित, तर देश सुरक्षित : शहा

ममता बॅनर्जींनी सीमा कुंपणासाठी जमीन नाकारल्‍याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

सिलिगुडी; वृत्तसंस्‍था : देशाच्या सीमा सुरक्षित होत नाहीत, तोपर्यंत पश्चिम बंगाल किंवा संपूर्ण भारत सुरक्षित राहू शकत नाही, असा ठाम पुनरुच्चार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी केला. यावेळी त्यांनी वारंवार विनंती करूनही माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यातील भारत-बांगला देश सीमेवर कुंपण घालण्यासाठी जमीन दिली नाही, असा आरोपही केला.

राज्यातील कोणत्याही माजी मुख्यमंत्र्यांनी सशस्त्र सीमा बल (एसएसबी) किंवा सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ ) कार्यक्रमांना हजेरी लावली नव्हती, असा उल्लेख करत शहा यांनी या परंपरेला छेद दिल्याबद्दल बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचे अभिनंदन केले.

सिलिगुडी येथील एसएसबीच्या फ्रंटियर मुख्यालयात विविध प्रकल्पांच्या भूमिपूजन आणि पायाभरणी समारंभात शहा म्हणाले, बीएसएफद्वारे सीमा कुंपण उभारण्यासाठी मी बॅनर्जी यांच्याकडे जमिनीची वारंवार मागणी केली. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. २०१४ पासून मी सीमा सुरक्षा बळकटीसाठी १,१२९ एकर जमिनीची मागणी करत होतो. राज्यात सुवेंदू अधिकारी यांचे सरकार स्थापन झाल्यानंतरच आम्हाला हा जमिनीचा तुकडा मिळाला.

एसएसबी ही राजकीय संघटना नाही, असे स्पष्ट करताना शहा म्‍हणाले, यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी सीमा सुरक्षा दलांच्या कार्यक्रमांपासून दूर राहून चुकीचा संदेश दिला. स्वातंत्र्य मिळाल्यापासून आधीच्या सरकारांनी 'वंदे मातरम्' या राष्ट्रगीताला योग्य तो सन्मान दिला नाही, याबद्दलही शहा यांनी खंत व्यक्त केली. यावर्षी स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात लाल किल्ल्यावरून गायले जाईपर्यंत भारतात 'वंदे मातरम्'चे पूर्ण रूप कधीही गायले गेले नव्हते. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचलेल्या या गीताच्या १५० व्या वर्षी अखेर देशाला त्याची खरी ओळख व सन्मान मिळाला, याचे मला समाधान आहे, असेही त्यांनी पुढे नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT