नवी दिल्ली : लांब पल्ल्याच्या विमान प्रवासात प्रवासी आरामात झोपतात. पण 17-17 तास सेवा देणारे फ्लाईट अटेंडंटस् कुठे विश्रांती घेतात, असा प्रश्न अनेकांना पडतो. नुकतेच ब्रायन नावाच्या एका फ्लाईट अटेंडंटने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून विमानातल्या एका खास सिक्रेट जागेचा खुलासा केला आहे.
या गुप्त जागेला क्रू रेस्ट कंपार्टमेंट असे म्हणतात. ही जागा प्रवाशांच्या नजरेपासून दूर एका छोट्या शिडीने वर गेल्यावर दिसते. इथे केबिन क्रूसाठी छोटे बेड, उशा आणि ब्लँकेटची सोय असते. विमानात हवेचा दाब बदलल्यास सुरक्षित राहण्यासाठी येथे बेडलाही सीट बेल्ट असतात. पडदे, वाचनासाठी दिवे आणि मनोरंजनासाठी टीव्हीची सोय असते. या भागात प्रवाशांना जाण्यास सक्त मनाई असते. ड्युटी संपल्यानंतर अटेंडंटस् त्यांचे युनिफॉर्म बदलून या क्रू रेस्ट कंपार्टमेंटमध्ये जाऊन झोपतात. लांबच्या प्रवासात क्रू मेंबर्सची ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी ही व्यवस्था केली जाते.