पुढारी ऑनलाईन डेस्क : सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच (Madhabi Puri Buch) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. माधबी बुच या आपल्या पदाचा गैरवापर करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, आता तपास पूर्ण झाला असून त्यांच्याविरोधात कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत.
अमेरिकन शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चने बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) च्या अध्यक्षा माधवी पुरी-बुच (Madhabi Puri Buch) यांच्यावर अदानींच्या कंपन्यांच्या समभागांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी वापरल्या जाणार्या फंडात गुंतवणूक केली होती, असे अहवालात म्हटले होते. या अहवालानंतर काँग्रेसनेही बुच यांच्यावर सेबीद्वारे नियमन केलेल्या कंपन्यांशी संबंध असल्याचा आरोप केला होता. त्यांना या कंपन्यांकडून मोठी देयके मिळाल्याचा आरोप होता. आरोपांच्या चर्चेदरम्यान सरकारने चौकशी सुरू केली होती. एजन्सी आणि अर्थ मंत्रालय या दोन्ही संस्थांनी हा तपास केला. यामध्ये माधबी बुच आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. तपास पूर्ण झाला असून काहीही आक्षेपार्ह आढळले नसल्याचे सूत्रांनी इंडिया टुडेला सांगितले. त्या सेबीच्या अध्यक्षपदावर कायम राहतील.