वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : जगाला भेडसावणार्या ‘प्लास्टिक प्रदूषण’ आणि ‘हवामान संकट’ या दोन मोठ्या समस्या एकाच वेळी सोडवण्यासाठी शास्त्रज्ञांनी एक प्रभावी उपाय शोधला आहे. कोपनहेगन विद्यापीठातील रसायन शास्त्रज्ञांनी प्लास्टिक कचरा कार्बन डायऑक्साईड (सीओ2) शोषून घेणार्या प्रभावी आणि टिकाऊ सामग्रीमध्ये रूपांतरित करण्याची पद्धत विकसित केली आहे.
या शोधाने ‘टाकाऊ वस्तूंमधून मौल्यवान साधन’ ही म्हण खरी करून दाखवली आहे. संशोधकांनी पीईटी प्लास्टिक कचरा सीओ2 शोषून घेणार्या बीएईटीए नावाच्या नवीन सामग्रीमध्ये रूपांतरित केला आहे. पीईटी प्लास्टिक हे बाटल्या, कपडे आणि इतर अनेक वस्तूंमध्ये वापरले जाते. सामान्यतः या प्लास्टिकचा कचरा जमिनीमध्ये किंवा समुद्रात जातो आणि प्रदूषण वाढवतो. परंतु, या नवीन पद्धतीमुळे हाच कचरा आता हवामानातील बदलांना तोंड देण्यासाठी वापरला जाईल.
‘बीएईटीए’ ही एक पावडरसारखी सामग्री आहे, जी सीओ2 शोषून घेण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. ही सामग्री औद्योगिक प्रकल्पांमध्ये सीओ2 उत्सर्जन कमी करण्यासाठी वापरली जाऊ शकते. एकदा संतृप्त झाल्यावर उष्णतेच्या प्रक्रियेद्वारे सीओ2 वेगळा केला जातो. हा वेगळा केलेला सीओ2 साठवून ठेवता येतो किंवा उपयुक्त वस्तूंमध्ये रूपांतरित केला जाऊ शकतो.