नवी दिल्ली : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात पालकांना सक्रिय भागीदार बनविण्याच्या दृष्टिकोनातून केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) २०२६-२७ सत्रासाठी नवे ‘पालकत्व कॅलेंडर’ सुरू केले आहे. याचा उद्देश पालक-शिक्षक बैठकांत पालकांना औपचारिक प्रेक्षकांऐवजी मुलाच्या विकासात ‘सक्रिय भागीदार’ बनवणे आहे.
शिक्षणाची पारंपरिक व्याख्या बदलणारा हा उपक्रम क्रांतिकारी मानला जात आहे. तसेच तो नवीन शिक्षण धोरणाच्या त्या दृष्टिकोनाचा भाग आहे. अभ्यासाचा अर्थ केवळ घोकंपट्टी करणे आणि चांगले गुण मिळवणे असा नाही. सोबतच मुलांचा मानसिक, सामाजिक आणि भावनिक विकास घडवून आणणे हा या उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे. पालक एकमेकांकडून शिकू शकतील यासाठी विशेष गट तयार केले जातील. मुलांसाठी कार्यक्रमही असतील.
मुलांच्या वर्तनातील बदल, चिंता ओळखण्यासाठी पालकांना प्रशिक्षण दिले जाईल. मुख्य म्हणजे सोशल मीडियाचे धोके, गेमिंगचे व्यसन आणि स्क्रीन टाईम व्यवस्थापन यावर तज्ज्ञांकडून सोप्या भाषेत मार्गदर्शन केले जाणार आहे.
चार संकल्पनांवर सखोल विचारविमर्ष
चिंतन : संगोपनाच्या पद्धतींवर विचार करणे, प्रोत्साहन : सकारात्मक वर्तनाला प्रोत्साहन देणे, आपसातील नाते : पालक आणि मुलांमधील विश्वासाचे नाते मजबूत करणे, आनंदोत्सव : मुलांच्या छोट्या-छोट्या यशाचा आणि एकत्र घालवलेल्या क्षणांचा आनंद साजरा करणे. या चार संकल्पना म्हणजे या कॅलेंडरची खासियत आहेत.
शाळा, पालक, शिक्षक यांच्यात समन्वय
मोबाईलचे व्यसन आणि करिअरचा दबाव मुलांना एकटे पाडत आहे. अशा परिस्थितीत शाळा, शिक्षक आणि पालक यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे. गंभीर समस्या निर्माण होण्यापूर्वीच त्वरित पालक-शिक्षक बैठक बोलावली जावी आणि त्याद्वारे मुलांच्या प्रश्नांवर मार्ग काढला जावा, अशी रचना या कॅलेंडरमध्ये करण्यात आल्याची माहिती सीबीएसईच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.