मुर्शिदाबाद; वृत्तसंस्था : पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात शुक्रवारी पहाटे रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या स्कूल व्हॅनला पॅसेंजर रेल्वेने जोरदार धडक दिल्याने तीन शाळकरी विद्यार्थी व एका सायकलस्वारासह पाचजणांचा मृत्यू झाला. कर्णसुवर्ण स्टेशनजवळील गोविंदपूर रेल्वे गेटवर घडलेल्या या घटनेत चारजण गंभीर जखमी झाले. या अपघाताला जबाबदार असल्याचा ठपका ठेवून लेव्हल क्रॉसिंगवर कर्तव्यावर असलेल्या गेटमनला अटक करण्यात आली.
हा विदारक अपघात हावडाकडे जाणाऱ्या ‘नवद्वीप धाम एक्स्प्रेस’ पुढे गेल्यानंतर काही वेळातच घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक्स्प्रेस रेल्वे जात असताना क्रॉसिंग बंद होते. मात्र, लगेच दुसरी पॅसेंजर ट्रेन येणार असूनही गेट उघडले गेले. विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या व्हॅनच्या चालकाने गेट उघडे असल्याचे पाहून रूळ ओलांडण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी एक सायकलस्वारही रूळ ओलांडत होता. तेवढ्यात भरधाव आलेल्या ‘निमतीता-कटवा’ लोकल ट्रेनने स्कूल व्हॅनला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे चक्काचूर होऊन व्हॅन रुळाच्या बाजूला फेकली गेली. यामुळे मुले आत अडकून पडली. गोविंदपूर गावातील तीन शाळकरी विद्यार्थी व सायकलस्वार जमशेद शेख (वय ५०) यांचा जागीच मृत्यू झाला.
व्हॅनमध्ये अडकलेल्या मुलांच्या किंचाळण्यामुळे गोळा झालेल्या स्थानिकांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. काही वेळात बहरामपूरचे पोलिसही मदतीला धावले. गंभीर जखमी तीन विद्यार्थ्यांसह व्हॅनचालकाला मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. मृतदेह विच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. अपघातामुळे संतप्त स्थानिकांनी रेल्वे रूळ रोखून धरला. यामुळे पूर्व रेल्वेची अझीमगंज-कटवा विभागातील रेल्वे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
पीडित कुटुंबांसह विशेषतः प्राण गमावलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांसोबत माझी सहानुभूती आहे. या तीव्र वेदना कमी करण्यासाठी शब्द अपुरे आहेत. या कठीण काळात संपूर्ण राज्य शोकाकुल कुटुंबांच्या पाठीशी उभे आहे. जखमी व बाधित कुटुंबांना शक्य ती सर्व मदत करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.सुवेंदू अधिकारी, मुख्यमंत्री, पश्चिम बंगाल