जखमीला रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेताना. Pudhari
राष्ट्रीय

Delhi Building Collapse | वाचवा, वाचवा...; ढिगाऱ्याखालून मदतीसाठी विद्यार्थ्यांचे फोन कॉल्स

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : ''वाचवा, वाचवा...आम्ही ढिगाऱ्याखाली अडकलो आहोत...,'' दिल्लीतील सत्यनिकेतन भागात रविवारी दुपारी कोसळलेल्या बहुमजली वसतिगृहाच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या काही विद्यार्थ्यांनी स्वतःच्या मोबाईलवरून बाहेर फोन केले. मदतीसाठी याचना केली. त्यामुळे कॉल करणाऱ्या विद्यार्थ्यांसह अनेक विद्यार्थी जिवंत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांना सुखरूप बाहेर काढण्याच्या आशा वाढल्या आहेत.

घटनास्थळी उपस्थित असलेले स्थानिक आमदार अनिल शर्मा यांनी परिस्थितीचा आढावा घेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, दुर्घटनाग्रस्त इमारत विद्यार्थ्यांसाठी पेईंग गेस्ट (पीजी) निवासस्थान म्हणून वापरली जात होती. रविवार असल्याने अनेक विद्यार्थी खोल्यांमध्येच हजर होते. ढिगाऱ्याखाली नेमके किती जण अडकले आहेत याची अचूक संख्या लगेच सांगता येत नाही. मात्र, अनेक विद्यार्थी आत अडकले आहेत. त्यातील काहींनी ढिगाऱ्याखालून फोन केले. बचाव पथके त्यांच्याशी संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

प्रशासनाकडून युद्धपातळीवर मदतकार्य

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस, दिल्ली अग्निशामक दल आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली आहेत. ढिगारा हटवून अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम वेगाने सुरू आहे. काही विद्यार्थ्यांना ढिगाऱ्यातून सुखरूप बाहेर काढून तातडीने उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. संपूर्ण सरकारी यंत्रणा उर्वरित विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी एकवटली आहे.

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून सर्व यंत्रणांना युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देश दिले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून लगतची इमारत रिकामी करण्यात आली आहे. भाजप आमदार अनिल शर्मा यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांशी पथक संपर्क साधत असून त्यांना सुखरूप बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

अमित शहा यांचा मुख्यमंत्र्यांशी संवाद

दिल्लीत इमारत कोसळल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट केले की, दिल्लीतील सत्यनिकेतन येथे इमारत कोसळल्याची घटना अत्यंत दुःखद आणि मन हेलावून टाकणारी आहे. या दुर्घटनेबाबत मी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांशी आणि पोलिस आयुक्तांशी तसेच एनडीआरएफ महासंचालकांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफचे पथक एकमेकांच्या समन्वयाने युद्धपातळीवर बचावकार्य करत आहेत. जखमींना आवश्यक ती सर्व वैद्यकीय मदत तातडीने उपलब्ध करून दिली जात आहे.

बेकायदेशीर बांधकामांवर संताप

गेल्या २० वर्षांपासून या भागात राहणाऱ्या प्रियांका यांनी सांगितले की, सत्यनिकेतनमध्ये अनेक जुन्या इमारतींवर नियमबाह्यपणे ५ ते ६ मजले उभारून पीजी सुरू करण्यात आले आहेत. घरमालक दुसरीकडे राहतात आणि केवळ ऑनलाईन भाडे गोळा करतात. देखभालीचा अभाव आणि निकृष्ट पाया यामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगत नागरिकांनी परिसरातील सर्व पीजी इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी केली आहे.

एमसीडी मुख्यालयात 'अभाविप'कडून तोडफोड

इमारत दुर्घटनेनंतर 'अभाविप'च्या कार्यकर्त्यानी सिव्हिक सेंटरमधील दिल्ली महापालिकेच्या (एमसीडी) मुख्यालयात धडक देत जोरदार तोडफोड केली. या दुर्घटनेसाठी महापालिकेचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप संघटनेने केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT