नवी दिल्ली; पीटीआय : एका धक्कादायक घडामोडीत पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी खुलासा केला आहे की, पाकिस्तान आणि सौदी अरेबियामध्ये झालेल्या नवीन सुरक्षा करारानुसार, भारताने हल्ला केल्यास सौदी अरेबिया पाकिस्तानच्या संरक्षणासाठी पुढे येईल. शुक्रवारी पाकिस्तानी वृत्तवाहिनी ‘जिओ टीव्ही’शी बोलताना आसिफ यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. भारताने पाकिस्तानविरोधात युद्ध पुकारले, तर या करारानुसार सौदी अरेबियाला हस्तक्षेप करणे बंधनकारक असेल, असे ते म्हणाले.
या संरक्षण कराराची तुलना नाटोच्या कलम 5 शी केली जात आहे, ज्यात सदस्य देशांमध्ये सामूहिक संरक्षणावर भर दिला जातो. आसिफ यांच्या मते, हा करार कोणत्याही हल्ल्याच्या परिस्थितीत एकमेकांचे संरक्षण करण्याच्या परस्पर वचनबद्धतेचे प्रतीक आहे. मात्र, हा करार पूर्णपणे बचावात्मक असून, कोणत्याही आक्रमक योजनेचा भाग नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.