राष्ट्रीय

Anti Paper Leak Bill : ‘पंतप्रधान होता आले नाही म्हणून PM निवासस्थानाबाहेर...’, राहुल गांधींवर बोचरी टीका

‘गोळ्या झाडण्याचा आदेश कोण देतं?’, पेपर लीक विधेयकावरील चर्चेदरम्यान मंत्री जितेंद्र सिंह यांचा जोरदार पलटवार

पुढारी वृत्तसेवा

paper leak bill 2026 lok sabha rahul gandhi vs BJP

नवी दिल्ली : पेपर लीकविरोधी विधेयकावर लोकसभेत सलग दुसऱ्या दिवशी सुरू असलेल्या चर्चेदरम्यान जोरदार राजकीय गदारोळ पाहायला मिळाला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी चर्चेत सहभागी होताना केलेल्या वक्तव्यांवरून सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तीव्र खडाजंगी झाली. राहुल गांधी यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आदेशावरून विद्यार्थ्यांवर गोळीबार झाल्याचा गंभीर आरोप केला. या आरोपांनंतर लोकसभेत प्रचंड गदारोळ झाला.

राहुल गांधी यांच्या या आरोपांना प्रत्युत्तर देताना केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी त्यांच्यावर थेट हल्लाबोल केला. राहुल गांधी यांनी असंसदीय आणि अपशब्दांचा वापर केल्याचे सांगत, त्यांच्याकडे सार्वजनिक जीवनातील अनुभवाची मोठी कमतरता असल्याचे सिंह म्हणाले. "राहुल गांधी यांचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही, म्हणूनच ते पंतप्रधान निवासाबाहेर जाऊन आंदोलनाला बसले," असा टोलाही त्यांनी लगावला.

'गोळीबाराचे आदेश मंत्री नव्हे, तर दंडाधिकारी देतात'

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्यांचा समाचार घेताना लोकसभेतील नियमांची आठवण करून दिली. विरोधी पक्षनेत्यांनी वापरलेली भाषा असंसदीय असल्याचे सांगत ते म्हणाले की, जर राहुल गांधी व्यक्तीविशेष किंवा विद्यार्थ्यांसाठी अशा शब्दांचा वापर करत असतील, तर ते अत्यंत दुर्दैवी आहे.

गृहमंत्री अमित शहा यांच्यावरील आरोपांचे खंडन करताना सिंह यांनी स्पष्ट केले की, ‘गोळीबाराचे आदेश कोणताही मंत्री देत नसून ते दंडाधिकारी, जिल्हाधिकारी किंवा उपविभागीय अधिकाऱ्यांना असतात. प्रत्यक्षात तेथे कोणताही गोळीबार झालेला नसून केवळ अश्रूधुराचा वापर करण्यात आला होता, असेही त्यांनी नमूद केले. राहुल गांधी यांना वास्तवाची माहिती नसून कोणतीही तथ्ये नसताना बेजबाबदारपणे सभागृहात वक्तव्ये करून निघून जाणे हे विरोधी पक्षनेत्याला शोभणारे वर्तन नाही,’ अशी खरमरीत टीका त्यांनी केली.

‘पंतप्रधान होण्याचे स्वप्न अधुरे राहिल्याने निदर्शने’

राहुल गांधी यांच्या पंतप्रधान निवासाबाहेरील आंदोलनाचा उल्लेख करत जितेंद्र सिंह म्हणाले की, ‘देशाने आपल्याला पंतप्रधान बनवावे अशी राहुल गांधी यांची तीव्र इच्छा आहे. मात्र, ते स्वप्न पूर्ण न झाल्यामुळेच २१ जुलै रोजी ते पंतप्रधान निवासाबाहेर जाऊन बसले. अधिकाऱ्यांनी त्यांना विनंती करून तेथून हटण्यास सांगितले असता, मला बळजबरीने उचलले गेले असा दावा त्यांनी केला. सुरुवातीला हे आंदोलन आम आदमी पक्षाचे आहे असे वाटल्याने ते यात सहभागी झाले नव्हते; परंतु नंतर राजकीय दृष्ट्या मागे पडू या भीतीने त्यांनी या आंदोलनात उडी घेतली,’ असा टोलाही सिंह यांनी लगावला.

नेमका काय आहे संपूर्ण वाद?

पेपर लीकशी संबंधित विधेयकावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सुमारे ५० मिनिटांचे भाषण केले. या भाषणात त्यांनी 'इडियट' आणि 'अंधभक्त' यांसारख्या शब्दांचा वापर केला, तसेच दिल्लीत विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्याचे आदेश गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्याचे विधान केले. या वक्तव्यानंतर सत्ताधारी भाजपच्या खासदारांनी सभागृहात प्रचंड गदारोळ करत राहुल गांधी यांच्या असंसदीय भाषेचा तीव्र निषेध केला.

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनीदेखील राहुल गांधी यांना ११ पेक्षा जास्त वेळा टोकले आणि सभागृहात अशा प्रकारच्या असंसदीय शब्दांचा वापर करता येत नसल्याचे स्पष्ट केले. तर दुसरीकडे, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभा अध्यक्षांना विनंती करून राहुल गांधी यांनी वापरलेले हे वादग्रस्त शब्द सभागृहाच्या कामकाजातून हटवण्याची मागणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT