संदीप दीक्षित file photo
राष्ट्रीय

संदीप दीक्षित यांनी मुख्यमंत्री अतिशी,संजय सिंह यांच्याविरोधात १० कोटी रुपयांच्या मानहानीचा दावा केला दाखल

Sandeep Dikshit: प्रकरणाची सुनावणी फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार संदीप दीक्षित यांनी मुख्यमंत्री अतिशी आणि खासदार संजय सिंह आणि इतरांविरुद्ध मानहानीचा दावा दाखल केला आहे. दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या या दाव्यात त्यांनी १० कोटी रुपयांच्या नुकसाभरपाईची मागणी केली आहे.

२६ डिसेंबर २०२४ रोजी पत्रकार परिषदेत आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या आरोपांमुळे हा मानहानीचा दावा दीक्षित यांनी केला आहे. आप नेत्यांनी आरोप केला होता की, 'आप'चा पराभव करण्यासाठी दीक्षित आणि काँग्रेस पक्षाने भाजपशी संगनमत केले आहे. तसेच संदिप दीक्षित यांनी यासाठी कोट्यवधी रूपये घेतल्याचा आरोप अतिशी आणि संजय सिंह यांनी केला होता, असे दीक्षित यांनी म्हटले आहे.

दीक्षित यांनी हे आरोप नाकारले आहेत. हे आरोप निराधार आणि बदनामीकारक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या आरोपांमुळे झालेल्या मानहानीबद्दल १० कोटी रुपयांची नुकसानभरपाई द्यावी असा दावा दीक्षित यांनी केला आहे. न्यायमूर्ती पुरुषेंद्र कुमार कौरव यांच्या खंडपीठासमोर मानहानीचा खटला सोमवारी सुनावणीसाठी ठेवण्यात आला. परंतु या प्रकरणाची सुनावणी फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली.

दरम्यान, संबंधित मानहानीच्या प्रकरणात, दिल्लीतील राऊस अव्हेन्यू न्यायालयाने गेल्या आठवड्यात अतिशी आणि संजय सिंग यांना नोटीस बजावली आहे. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी पारस दलाल यांनी जारी केलेल्या नोटीसमध्ये आप नेत्यांना आरोपांना उत्तर देण्यासाठी २७ जानेवारी २०२५ रोजी हजर राहण्यास सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT