पुढारी ऑनलाईन डेस्क : तिरुमला तिरुपती देवस्थानमच्या प्रसादाच्या लाडूतील तुपात गाय, आणि माशांच्या चरबीचे तेल असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर देशभरात गदारोळ निर्माण झाला आहे. आता या लाडूंचे पावित्र्य पुनर्स्थापित करण्यात आले असल्याची माहिती तिरुमला तिरुपती देवस्थानमने दिली आहे.
देवस्थानमच्या वतीने एक्स पोस्ट करून ही माहिती देण्यात आलेली आहे. "प्रसादाच्या लाडूंच्या दर्जाबद्दल भाविकांकडून तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे लाडू बनवणाऱ्या कर्मचाऱ्यांशी बोलून आम्ही तुपाचे नमुने बाहेरच्या प्रयोगशाळेत तापसणीसाठी पाठवले. त्यात तुपात काही बाह्य घटक दिसून आले," असे एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे." ही बातमी टाइम्स ऑफ इंडियाने दिलेली आहे.
तुपाची तपासणी करण्यासाठीची यंत्रसामुग्री आमच्याकडे नाही, याचा गैरफायदा घेतला गेला आहे. आता नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाने ही यंत्रसामुग्री देणार असल्याचे सांगितले आहे. "प्रिमिअर अॅग्रीफूड, कृपारम डेअरी, वैष्णवी, पराग मिल्क आणि ए. आर. डेअरी असे पाच पुरवठादार तूप पुरवतात. यातील ए. आर. डेअरीकडून आलेले तूप कमी दर्जाचे दिसून आले आहे." ट्रस्टने तातडीचा उपाय म्हणून तुपाचा पुरवठा थांबवला असून गुणवत्ता तपासणीसाठी तज्ज्ञांची समिती स्थापन केली आहे.