देशातील वाढता लठ्ठपणा आणि साखर-तेलयुक्त आहाराच्या समस्येला सामोरे जाण्याच्या दृष्टीने स्वास्थ्य मंत्रालयाने देशभरातील केंद्रीय संस्थांना 'तेल आणि साखर' फलक लावण्याचे आदेश दिले आहेत. या बोर्डवर समोसा, जिलेबी, लाडू, वडा पाव यासारख्या रोजच्या नाश्त्यांतील फॅट आणि साखरेचे प्रमाण स्पष्टपणे नमूद केले जाईल, अगदी तंबाखूच्या जशी आरोग्यासाठी धोकादायक आहे त्याप्रमाणे...
इतिहास सांगतो की मध्य पूर्वेतून भारतात दोन पदार्थ आले, ते म्हणजे जिलेबी आणि समोसा. आता एखादी व्यक्ती त्याला हवे तितके पिझ्झा आणि मोमोज खाऊ शकते, परंतु गरमा गरम समोसे आणि जिलेबी दिसताच व्यक्तिला मोह आवरता येत नाही. पण आता तो दिवस दूर नाही जेव्हा तुम्हाला दुकानांमध्ये आता आरोग्यासाठी धोकादायक असे संदेश देणारे बोर्ड दिसू लागतील. ज्यावर तुमच्या नाश्त्यात किती साखर आणि चरबी लपलेली आहे हे मोठ्या अक्षरात लिहिलेले असेल.
सर्व सरकारी संस्थांमध्ये लवकरच हे चेतावणी बोर्ड लावले जाणार आहेत.
लाडू, वडा पाव, पकौडा, गुलाबजामुन यांसारख्या सर्व लोकप्रिय स्नॅक्स आणि मिठायांची तपासणी सुरू आहे.
नागरिकांना त्यांच्या आहारातील लपलेल्या साखर आणि फॅटचे प्रमाण समजावे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार, आता सरकारी कॅन्टीन, कॅफे आणि सार्वजनिक ठिकाणी विकल्या जाणाऱ्या सर्व खाद्यपदार्थांवर मोठ्या अक्षरात फॅट आणि साखरेचे प्रमाण दर्शवणारे बोर्ड लावले जातील. नागपूरमधील AIIMSसह देशभरातील सर्व केंद्रीय संस्थांना हे आदेश लागू करण्यात आले आहेत. या बोर्डवर समोसा, जिलेबी, लाडू, वडा पाव, पकौडा यांसारख्या लोकप्रिय पदार्थांमध्ये किती प्रमाणात साखर आणि तेल आहे, हे स्पष्टपणे लिहिलेले असेल.
"ही फूड लेबलिंगची सुरुवात आहे, जी सिगरेटच्या चेतावणीइतकीच गंभीर होत चालली आहे. साखर आणि ट्रान्स फॅट हे नव्या काळातील तंबाखू आहेत. लोकांना काय खात आहेत, हे जाणून घेण्याचा अधिकार आहे,"डॉ. अमर आमले, अध्यक्ष, कार्डियोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया, नागपूर शाखा
आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत अहवालानुसार, २०५० पर्यंत भारतात ४४.९ कोटी लोक लठ्ठपणाने ग्रस्त असतील. सध्या प्रत्येक पाचपैकी एक शहरी युवक जास्त वजनाच्या समस्येला सामोरे जात आहे. चुकीच्या आहार आणि कमी व्यायामामुळे लहान मुलांमध्येही लठ्ठपणा प्रमाण वाढत आहे. त्यामुळे जंक फूडबद्दल जनजागृती करण्यासाठी आणि नागरिकांना त्यांच्या आहारातील साखर-तेलाचे प्रमाण समजावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
ज्येष्ठ डायबेटोलॉजिस्ट डॉ. सुनील गुप्ता सांगतात, "हा खाद्यपदार्थांवर बंदी घालण्याचा मुद्दा नाही. पण जर लोकांना माहिती मिळाली की एका गुलाबजामुनमध्ये पाच चमचे साखर असू शकते, तर ते पुन्हा तो पदार्थ घेण्याआधी दोनदा विचार करतील."