Samastipur Girl Harassment Viral Video Pudhari
राष्ट्रीय

Samastipur Video: ‘मला सोडा...', समस्तीपूरमध्ये तरुणीला रस्त्यात अडवलं, हात पकडला अन् शिवीगाळ केली, संतापजनक VIDEO व्हायरल

Samastipur Girl Harassment Viral Video: समस्तीपूरमध्ये रस्त्यावर एका तरुणीशी काही तरुणांनी छेडछाड आणि गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Samastipur Girl Harassment Viral Video: बिहारमधील जमुई येथील विद्यार्थिनीशी झालेल्या छेडछाडीच्या घटनेनंतर आता समस्तीपूर जिल्ह्यातही असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रस्त्यावर एका तरुणीशी काही तरुणांनी छेडछाड करत तिचा हात पकडला आणि गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. या घटनेचा ५६ सेकंदांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत चार संशयित आरोपींना अटक केली आहे.

जगतसिंहपूर गावातील घटना

ही घटना समस्तीपूर जिल्ह्यातील कर्पूरीग्राम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जगतसिंहपूर गावातील बांध बायपास रोडवर घडल्याची माहिती आहे. बुधवारी संध्याकाळपासून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

व्हिडिओमध्ये काही तरुण एका तरुणीला त्रास देताना दिसत आहेत. तरुणी त्यांच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत असताना एक तरुण तिचा हात पकडताना दिसतो. विरोध केल्यानंतरही तरुणांनी तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे.

‘मला सोडा, भावाला बोलावते’ असं म्हणत होती तरुणी

व्हायरल व्हिडिओमध्ये तरुणी वारंवार आपल्याला सोडून देण्याची विनंती करताना दिसते. ती ‘मला सोडा, मी माझ्या भावाला बोलावते’, असं सांगताना ऐकू येते. त्यावर संबंधित तरुण ‘ठीक आहे, बोलव’ असं म्हणताना दिसतात.

व्हिडिओमध्ये तरुणीकडे अश्लील पद्धतीने हात करण्याचा आणि तिच्याशी शिवीगाळ करत गैरवर्तन करण्याचा आरोप आहे. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ घटनास्थळी उपस्थित असलेल्या व्यक्तीने रेकॉर्ड केल्याचे सांगितले जात आहे.

व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची कारवाई

घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर समस्तीपूर पोलिसांनी तातडीने कारवाई केली. प्रभारी सदर डीएसपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हिडिओमध्ये तरुणीशी गैरवर्तन करताना दिसणाऱ्या चारही आरोपींना गुरुवारी पहाटे त्यांच्या घरातून अटक करण्यात आली.

अटक केलेल्या आरोपींपैकी विकास कुमार शर्मा आणि राहुल कुमार यांची नावे समोर आली आहेत. विकास कुमार शर्मा याच्याविरोधात यापूर्वीही दारूशी संबंधित काही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

फोटो काढण्यासाठी थांबली होती तरुणी

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी एका मुलासोबत बांध बायपास रोडवरून जात होती. यावेळी ती रस्त्यात थांबून फोटो काढत होती. त्याचवेळी काही स्थानिक तरुण तिथे आले.

आरोपानुसार, या तरुणांनी शिवीगाळ करत तिच्याशी गैरवर्तन आणि छेडछाड करण्यास सुरुवात केली. याचवेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या कोणीतरी व्हिडिओ शूट केला. नंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. जमुईनंतर समस्तीपूरमध्येही रस्त्यावर तरुणीशी गैरवर्तन झाल्याने पोलिसांच्या कारवाईसोबतच सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT