samastipur bpsc teacher wife girlfriend love story
पुढारी ऑनलाईन :
बिहारमधील समस्तीपूर येथे बीपीएससी शिक्षक तरुण कुमार यांनी गळफास लावून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मृताच्या कुटुंबियांनी एका महिला शिक्षकावर लग्नासाठी दबाव आणणे आणि मानसिक छळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तरुण कुमार यांचा विवाह 2017 मध्ये वैशाली येथील राइमा प्रसाद यांच्यासोबत झाला होता. दोघांनी नोकरी मिळाल्यानंतरच कुटुंब वाढवण्याचा निर्णय घेतला होता. दीर्घ प्रयत्नांनंतर 2023 मध्ये दोघांनी बीपीएससी टीआरई-1 परीक्षा उत्तीर्ण होऊन शिक्षकाची नोकरी मिळवली. तरुण यांची नियुक्ती मुजफ्फरपूर येथे, तर त्यांच्या पत्नीची समस्तीपूरमधील केशोपट्टी गावात झाली होती.
पत्नीच्या शाळेजवळ राहत असताना तरुण यांची ओळख त्याच शाळेत कार्यरत असलेल्या नालंदा येथील एका महिला शिक्षकासोबत झाली. हळूहळू दोघांमध्ये जवळीक वाढली आणि हे संबंध प्रेमसंबंधात बदलले. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, संबंधित महिला शिक्षक तरुण यांच्यावर पत्नीला घटस्फोट देऊन तिच्याशी लग्न करण्यासाठी सतत दबाव टाकत होती.
या संबंधामुळे घरात वाद वाढू लागले. मृताचे वडील अभिनव कुमार यांनी सांगितले की, त्यांनी अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र परिस्थितीत सुधारणा झाली नाही. इतकेच नव्हे तर पत्नी राइमा प्रसाद यांनीही समजुतीने एकत्र राहण्याची तयारी दर्शवली होती, परंतु महिला शिक्षक घटस्फोटावर ठाम होती. या संदर्भात एक ऑडिओ क्लिपही समोर आली असून त्यात लग्नासाठी दबाव टाकल्याचे बोलले जात आहे.
सततच्या ताणतणावामुळे आणि दबावामुळे तरुण कुमार यांनी जीवन संपवण्यासारखे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर कुटुंबात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच मुसरीघरारी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनानंतर तो कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. डीएसपी संजय कुमार पांडेय यांनी सांगितले की. प्राथमिक तपासात हा आत्महत्येचा प्रकार वाटत आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीनुसार सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.
दरम्यान, मृताच्या वडिलांनी संबंधित महिला शिक्षकाविरुद्ध एफआयआर दाखल केला असून पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.