सीतापूर; वृत्तसंस्था : समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी कॅबिनेट मंत्री आझम खान यांची मंगळवारी तब्बल दोन वर्षांच्या कारावासानंतर सीतापूर तुरुंगातून जामिनावर सुटका झाली. तुरुंगातून बाहेर येताच, आपल्या पारंपरिक पांढर्या कुर्ता-पायजमा आणि काळ्या जॅकेटमध्ये असलेल्या खान यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला नाही. एका खासगी वाहनातून ते थेट रवाना झाले.
सकाळीच खान यांचा मोठा मुलगा अदीब शेकडो कार्यकर्त्यांसह त्यांना घेण्यासाठी तुरुंगाबाहेर पोहोचले होते. समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय सचिव अनुप गुप्ता, मुरादाबादचे खासदार रुची वीरा आणि जिल्हाध्यक्ष छत्रपती यादव यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. अदीब यांनी आझम खान यांचा ‘नायक’ म्हणून गौरव केला. रुची वीरा यांनी हा दिवस ‘न्यायाच्या विजयाचा दिवस’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले.
दरम्यान, संभाव्य अनुचित घटना टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सीतापूरमध्ये भारतीय नागरिक सुरक्षा संहिताच्या कलम 163 अंतर्गत जमावबंदी लागू केली होती. तरीही मोठ्या संख्येने कार्यकर्ते तुरुंगाबाहेर पोहोचले.