Salman Khan on Sonam Wangchuk : 'नीट' पेपर फुटीच्या मुद्द्यावरून कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर, आता अभिनेता सलमान खानने प्रसिद्ध समाजसेवक सोनम वांगचुक यांना आपले उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच, पंतप्रधानांनी याप्रकरणी कठोर कारवाईचे आश्वासन दिले असल्याने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आता घरी परत जावे, अशी विनंतीही त्याने केली आहे.
लडाखमध्ये शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणणारे कार्यकर्ते सोनम वांगचुक हे पेपर फुटीच्या विरोधात आणि शिक्षण व्यवस्थेत सुधारणांच्या मागणीसाठी २८ जूनपासून उपोषणाला बसले आहेत. सलमान खानने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "सोनम, आता हे प्रकरण इथेच थांबव. हा विषय आणखी ताणू नकोस. गरज पडल्यास (जी पडेल असे मला वाटत नाही) हा उत्साह नंतर कधीतरी दाखवता येईल; आता काहीतरी खाऊन घे. तुला हवं असेल, तर मी घरून जेवण पाठवून देईन."
सलमानने पोस्टमध्ये म्हटलं की, "शैक्षणिक आणि सुरक्षेच्या दृष्टीने विद्यार्थी ही देशाची पहिली प्राथमिकता आहेत. त्यामुळे त्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी अजिबात काळजी करू नये. माननीय पंतप्रधानांनी स्वतः ट्विट केले आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की, या पेपर फुटीला जबाबदार असलेल्यांवर ते कठोर कारवाई करतील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता आपापल्या घरी आणि पालकांकडे परत जावे."
याआधीही सलमान खानने विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत त्यांच्या या लढ्याचे 'राजकीय हायजॅक' होऊ नये, असा इशारा दिला होता. इंस्टाग्राम पोस्टमध्ये विद्यार्थ्यांच्या "शांततापूर्ण" आंदोलनाचे कौतुक करताना त्याने विद्यार्थ्यांना "धाडसी आणि शूर" म्हटले होते."हा मुद्दा विद्यार्थी आणि शिक्षण व्यवस्थेमधील आहे. याचे राजकीय हायजॅक होऊ नये. याचे सर्व श्रेय फक्त आपल्या देशातील विद्यार्थ्यांनाच गेले पाहिजे. मला खात्री आहे की सरकार त्यांना पूर्ण पाठिंबा देईल आणि शिक्षण व्यवस्था अधिक मजबूत करेल. हा सर्वांचाच विजय आहे. सकारात्मक निर्णयासाठी प्रार्थना करत आहे," असे सलमानने आपल्या पोस्टमध्ये नमूद केले होते.
विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला सलमान खानव्यतिरिक्त ओमी वैद्य, झीनत अमान, नसरुद्दीन शाह, रत्ना पाठक शाह, अभय देओल, सोनाक्षी सिन्हा आणि रितेश देशमुख यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी पाठिंबा दिला आहे.
सलमाननंतर अभिनेत्री करीना कपूरनेही या मुद्द्यावर भाष्य केले आहे. इंस्टाग्रामवर तिने पोस्ट केली आहे की, "मी गेल्या काही दिवसांपासून या विषयाचा विचार करत होते, पण आता मी गप्प बसू शकत नाही. ऐकून घेण्याची विनंती करणाऱ्या या अनेक तरुण आवाजांकडे दुर्लक्ष करणे अशक्य आहे... आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेही नाही पाहिजे. शिक्षण मुलांना आशेचा किरण दाखवते, पण ते तेव्हाच शक्य आहे जेव्हा मुलांचा त्यावर विश्वास असेल. जेव्हा प्रामाणिकपणा, कष्ट आणि गुणवत्तेला काहीच किंमत उरली नाही असा संशय येतो, तेव्हा मुलांचा या व्यवस्थेवरून विश्वास उडतो. कोणत्याही मुलाला आपले प्रयत्न पुरेसे ठरतील की नाही, अशी शंका घेण्याची वेळ येऊ नये. त्यांना एका विश्वासार्ह व्यवस्थेची गरज आहे. जिथे गुणवत्तेला वाव असेल, कष्टाचे फळ मिळेल आणि प्रत्येक मुलाला समान संधी मिळेल. ही काही खूप मोठी मागणी नाही, ही तर मूलभूत गरज आहे. जेव्हा संपूर्ण पिढी स्वतःच्या भविष्यासाठी एका आवाजात बोलते, तेव्हा त्यांचे ऐकून घेणे हे औदार्य नसून ते आपले कर्तव्य आहे."