पुढारी ऑनलाईन डेस्क : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून भारत भेटीचे (Vladimir Putin India Visit) आमंत्रण देण्यात आले आहे. त्यांच्या भारत दौऱ्याच्या तारखा २०२५ च्या सुरुवातीला निश्चित केल्या जातील, अशी माहिती क्रेमलिनचे सहकारी युरी उशाकोव्ह यांनी दिली आहे. आम्हाला भारताचे पंतप्रधान मोदींचे आमंत्रण मिळाले आहे. आम्ही त्याचा नक्कीच सकारात्मक विचार करू. पुढील वर्षीच्या सुरुवातीला आम्ही तात्पुरत्या तारखा ठरवू, असे उशाकोव्ह यांनी म्हटले आहे.
2022 मध्ये रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर पुतिन यांचा हा पहिलाच भारत दौरा असेल. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी 6 डिसेंबर 2021 रोजी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत 21 व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी शेवटचा भारत दौरा केला होता. पुतीन यांच्या दौऱ्याबाबत भारताने अद्याप अधिकृतपणे प्रतिक्रिया दिलेली नाही.
22-23 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मोदींनी रशियाला भेट दिली होती. त्यानंतर पुतिन यांच्या बहुप्रतिक्षित भारत भेटीची (Vladimir Putin India Visit) चर्चा सुरू झाली होती. पंतप्रधान मोदी रशियन फेडरेशनच्या अध्यक्षतेखाली कझान येथे झालेल्या 16 व्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी रशियाला गेले. पंतप्रधान मोदींनी या वर्षी जुलैमध्ये मॉस्कोलाही भेट दिली होती, 2024 मध्ये त्यांची पहिलीच भेट होती. 22 व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली होती.
रशियन मीडिया रिपोर्ट्सनुसार, युक्रेनमधील कथित युद्ध गुन्ह्यांसाठी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने (ICC) पुतिन यांना अटक वॉरंट जारी केले आहे. रोम कायद्यानुसार, न्यायालयाच्या स्थापना करारानुसार, ICC सदस्यांना अटक वॉरंट जारी केलेल्या संशयितांना ताब्यात घेणे बंधनकारक आहे. तथापि, भारताने रोम कायद्यावर स्वाक्षरी किंवा मान्यता दिलेली नाही.