Putin x
राष्ट्रीय

Putin India Visit 2025 | ट्रम्प टॅरिफच्या पार्श्वभुमीवर मोठी घडामोड; रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन या महिन्यात भारतात येणार, दौरा ठरला!

Putin India Visit 2025 | राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची माहिती

Akshay Nirmale

Putin India Visit 2025

नवी दिल्ली / मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा या महिन्यात भारत दौरा निश्चित झाला आहे, अशी माहिती राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी दिली आहे. डोवाल सध्या रशियाच्या दौऱ्यावर असून, त्यांनी मॉस्कोमध्ये ही घोषणा केली.

इंटरफॅक्स वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पुतिन यांचा भारत दौरा ऑगस्टच्या उत्तरार्धात होण्याची शक्यता आहे.

अजित डोवाल म्हणाले, “भारत आणि रशियामधील संबंध अतिशय जुने आणि विशेष आहेत. या संबंधांमध्ये उच्चस्तरीय भेटीगाठींनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या भारत दौऱ्याबाबत आम्ही खूप उत्साहित आहोत. तारीखा जवळपास निश्चित झाल्या आहेत.”

भारत-अमेरिका संबंध तणावात

पुतिन यांचा भारत दौरा जाहीर होत असतानाच भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी तणाव अधिक तीव्र झाला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी एक नवा कार्यकारी आदेश जारी करत भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर 25 टक्के अतिरिक्त कर लावण्याची घोषणा केली आहे. भारताच्या रशियन तेल खरेदीवरून ट्रम्प प्रशासन नाराज असून, त्याचा परिणाम दोन्ही देशांतील व्यापारावर दिसू लागला आहे.

अमेरिकेने यापूर्वी इशारा दिला होता की, रशियन तेल खरेदी करणाऱ्या देशांवर दुय्यम निर्बंध (secondary sanctions) लावले जातील, जोपर्यंत रशिया युक्रेनमधील युद्ध थांबवत नाही. हे युद्ध आता चौथ्या वर्षात प्रवेश करत आहे.

पुतिन-ट्रम्प भेटही लवकरच

दरम्यान, क्रेमलिनकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पुतिन लवकरच राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी देखील भेटणार आहेत. रशियन परराष्ट्र सल्लागार युरी उशाकोव्ह यांनी सांगितले की, दोन्ही नेत्यांमध्ये भेटीचे आयोजन सुरू असून, स्थान निश्चित झाले आहे. त्याबाबत अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल.

राजकीय आणि व्यापारी घडामोडींवर लक्ष

पुतिन यांचा भारत दौरा आणि ट्रम्प यांच्या व्यापार धोरणामुळे निर्माण झालेली स्थिती ही भारतासाठी अत्यंत नाजूक आहे. एकीकडे भारत-रशिया परस्पर सहकार्याचा पुरातन वारसा जपत आहेत, तर दुसरीकडे अमेरिकेशी व्यापार आणि राजनैतिक संबंध टिकवण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

रशियन तेलाच्या खरेदीवरून उद्भवलेला हा आंतरराष्ट्रीय तणाव पुढील काही आठवड्यांत कोणती दिशा घेईल, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT