परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर file photo
राष्ट्रीय

रशियन तेलावरून लावलेले निर्बंध अयोग्य : परराष्ट्रमंत्री

अमेरिकेच्या दडपशाहीला भारताचे सडेतोड उत्तर

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारताने रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे अमेरिकेने भारतीय वस्तूंवरील आयात शुल्कात 50 टक्क्यांहून अधिक वाढ केली आहे. या दडपशाहीला भारताने तीव्र शब्दांत उत्तर दिले आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेने लादलेले शुल्क अन्यायकारक आणि अवास्तव असल्याचे म्हटले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, भारत आपल्या शेतकर्‍यांच्या आणि लहान उत्पादकांच्या हिताशी कोणतीही तडजोड करणार नाही.

शेतकर्‍यांचे हित सर्वोच्च

जयशंकर यांनी भारताची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या शेतकर्‍यांचे आणि लहान उत्पादकांचे हित. जेव्हा कोणी आमच्या यशापयशावर भाष्य करते, तेव्हा आम्ही एक सरकार म्हणून आमच्या शेतकर्‍यांच्या हिताचे रक्षण करण्यास वचनबद्ध आहोत. यावर आम्ही ठाम आहोत आणि यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही.

युरोप आणि चीनवर वेगळा न्याय का?

परराष्ट्रमंत्र्यांनी या मुद्द्याला केवळ ‘तेलाचा वाद’ म्हणून सादर करण्यावर आक्षेप घेतला. ते म्हणाले की, रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर जी टीका केली जात आहे, तीच टीका चीन आणि युरोपीय देशांसारख्या मोठ्या आयातदारांवर का केली जात नाही? हा मुद्दा तेलाचा असल्याचे भासवले जात आहे. कारण, भारताला लक्ष्य करण्यासाठी जे तर्क वापरले जात आहेत, तेच तर्क सर्वात मोठा तेल आयातदार असलेल्या चीनवर किंवा सर्वात मोठा एलएनजी आयातदार असलेल्या युरोपीय देशांबाबत लागू केले जात नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

जयशंकर यांनी पुढे सांगितले की, युरोप रशियासोबत भारतापेक्षा कितीतरी जास्त व्यापार करतो. युद्धाला निधी पुरवण्याचा युक्तिवाद असेल, तर युरोपच्या पैशाने रशियाची तिजोरी भरत नाही का? एकूण रशिया-युरोप व्यापार हा रशिया-भारत व्यापारापेक्षा खूप मोठा आहे. त्यामुळे भारताला एकटे पाडण्याचा प्रयत्न चुकीचा आहे. अलीकडेच जयशंकर यांनी रशियाचा दौरा केला होता, जिथे त्यांनी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह यांची भेट घेतली होती. या दौर्‍यातून भारताने आपले स्वतंत्र परराष्ट्र धोरण कायम ठेवण्याचे संकेत दिले आहेत.

राष्ट्रीय हित सर्वतोपरी

भारताला आपल्या राष्ट्रीय हितानुसार निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे जयशंकर यांनी ठामपणे सांगितले. ते म्हणाले, आपल्या राष्ट्रीय हितासाठी निर्णय घेणे हा आमचा हक्क आहे. यालाच ‘सामरिक स्वायत्तता’ म्हणतात. भारत-अमेरिका संबंधांमधील तणावावर बोलताना ते म्हणाले की, दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे. आम्ही दोन मोठे देश आहोत. चर्चेचे दरवाजे बंद झालेले नाहीत आणि पुढे काय होते ते पाहू, असे त्यांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT