Russia honour Biju Patnaik
नवी दिल्ली : रशियन दूतावासात ओडिशाचे माजी मुख्यमंत्री बिजू पटनायक यांच्या सन्मानार्थ एका स्मृतीफलकाचे उद्घाटन करण्यात आले.
माजी मुख्यमंत्री आणि बिजू यांचे पुत्र नवीन पटनायक आणि भारतातील रशियन राजदूत डेनिस अलीपोव्ह यावेळी उपस्थित होते. दुसऱ्या महायुद्धातील स्टालिनग्राडच्या ऐतिहासिक युद्धात बिजू पटनायक यांच्या योगदानासाठी हा सन्मान करण्यात आला आहे.
बिजू पटनायक यांचा राजकीय प्रवास प्रसिद्ध असला तरी त्यांच्या तरुणपणात ते एक पराक्रमी वैमानिक म्हणून ओळखले जात होते. 1936 साली त्यांनी रॉयल इंडियन एअर फोर्समध्ये प्रवेश घेतला होता.
दुसऱ्या महायुद्धात त्यांनी डकोटा (Douglas C-47 Skytrain) सारख्या विमानांमधून अनेक महत्त्वाच्या पुरवठा मोहिमा पार पाडल्या.
स्टालिनग्राड युद्धादरम्यान (ऑगस्ट 1942 ते फेब्रुवारी 1943), ज्या वेळी रशियन सेना जर्मन फौजांकडून वेढली गेली होती, तेव्हा पटनायक यांनी बेसीज्ड रेड आर्मी साठी शस्त्रास्त्रे व आवश्यक पुरवठा घेऊन अनेकदा उड्डाण केले.
यामुळे जखमी सैन्यांना मदत झाली, आणि रशियन सेनेच्या प्रतिकाराला बळ मिळाले.
23 ऑगस्ट 1942 रोजी जर्मन सेनेने स्टालिनग्राडवर जोरदार हल्ला केला. काही महिन्यांत शहराचे 90 टक्के भाग जर्मनांच्या ताब्यात गेले होते. मात्र, नोव्हेंबर 1942 मध्ये ऑपरेशन युरेनस अंतर्गत रशियन सेनेने जबरदस्त प्रतिहल्ला करत 3 लाखांहून अधिक अॅक्सिस सैनिकांना वेढले.
कडाक्याच्या हिवाळ्यात पुरवठा बंद पडल्याने जर्मन सेना हळूहळू खचत गेली. अखेरीस 30 जानेवारी 1943 रोजी जनरल फ्रेडरिक पॉलस यांनी शरणागती पत्करली.
ही लढाई इतकी निर्णायक ठरली की त्यानंतर जर्मन सेना पूर्व युरोपात पुन्हा कधीही पुढे सरकू शकली नाही. हीच ती लढाई होती ज्यामुळे दुसऱ्या महायुद्धाचे पारडे मित्र राष्ट्रांच्या बाजूने झुकले.
रशियन राजदूत डेनिस अलीपोव्ह यांनी नवीन पटनायक यांना पाठवलेल्या पत्रात लिहिले आहे की, “स्टालिनग्राड मोहिमेत सहभागी झालेले, भारतीय राष्ट्रीय एअरवेजचे वैमानिक बिजू पटनायक हे आमच्या दृष्टीने एक वीर योद्धा होते. त्यांच्या योगदानाची आम्ही सदैव आठवण ठेवू.”
नवीन पटनायक यांनीही आपल्या वडिलांच्या कार्याचा गौरव करत हा अभिमानाचा क्षण असल्याचे म्हटले. दरम्यान, बिजू पटनायक यांचा हा पराक्रम फक्त भारतासाठी नव्हे, तर जागतिक लढ्याच्या इतिहासातही एक स्फूर्तीदायक अध्याय आहे, असे सांगितले जाते.