नवी दिल्ली : सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपनेच अधिवेशनात दोन्ही सभागृहात जाणूनबुजून व्यत्यय आणला, असा आरोप करत काँग्रेसने भाजपवर हल्ला चढवला. हुकूमशाही भाजपच्या डीएनएमध्ये रुजली आहे, अशी टीकाही काँग्रेसने केली.
राजधानी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात पक्षाचे लोकसभेतील उपनेते गौरव गोगोई आणि राज्यसभेतील उपनेते प्रमोद तिवारी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना तिवारी म्हणाले की, सत्ताधारी पक्षाने सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणण्याची ही पहिलीच वेळ आहे. मणिपूरवरील चर्चेसाठी ३ तासांचा वेळ देण्यात आला होता मात्र फक्त ५० मिनिटे चर्चा झाली. या मुद्द्यावर दीर्घ चर्चा टाळण्यासाठी सरकारने जाणूनबुजून राज्यसभेचे कामकाज रात्री चालवले. सदस्यांची मान्यता न घेता सभागृहाचा कार्यक्रम मनमानी पद्धतीने वाढविण्यात आला. गुरुवारी, राज्यसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक आणि मणिपूर सारख्या मुद्द्यांवर पहाटे ४ वाजेपर्यंत चर्चा झाली. मात्र संध्याकाळी ६ नंतर कामकाजाचा वेळ वाढवण्यासाठी सभागृहाची मंजुरी घेतली गेली नाही, असे करणे म्हणजे नियम ३७ चे उल्लंघन असल्याचे तिवारी म्हणाले. लोकसभेत मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर अनुराग ठाकूर यांनी निराधार आरोप केल्याचे म्हणत तिवारींनी पक्षाच्यावतीने अनुराग ठाकूर यांचा निषेधही केला.
यावेळी गौरव गोगोई म्हणाले की, संसद आता लोकांचा आवाज उठवण्याचे व्यासपीठ राहिलेले नाही, तर ते सभागृह पंतप्रधान मोदींचा दरबार बनले आहे, जिथे त्यांची स्तुती स्वीकारली जाते मात्र सरकारवरील टीका दाबली जाते. सत्ताधारी पक्षाचे सदस्य जबाबदारी टाळण्यासाठी नियमितपणे सभागृहात व्यत्यय आणत होते आणि सभागृह तहकूब करत होते, असाही आरोप त्यांनी केला. गोगोई म्हणाले की, अमेरिकेने लादलेल्या २७ टक्के शुल्कामुळे भारतीय अर्थव्यवस्था आणि शेअर बाजार हादरला आहे. यामुळे शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या मध्यमवर्गीयांचे कष्टाचे पैसे वाया गेले आहेत, मात्र सरकार या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करत नाही, असेही ते म्हणाले.