Rule Change Today: आजपासून देशात लागू झाले 'हे' ५ मोठे बदल... गॅस, दूधापासून कारपर्यंत महागाईचा चौफेर तडाखा.. file photo
राष्ट्रीय

Rule Change Today : आजपासून देशात लागू झाले 'हे' ५ मोठे बदल... गॅस, दूधापासून कारपर्यंत महागाईचा चौफेर तडाखा..

सप्टेंबर महिन्याची सुरुवात देशात अनेक मोठ्या आर्थिक बदलांसह (Financial Change) झाली आहे.

पुढारी वृत्तसेवा

rule change today 1st september cng png milk car price hike lpg ekyc air travel

पुढारी ऑनलाईन : सप्टेंबर महिन्याची सुरुवात देशात अनेक मोठ्या आर्थिक बदलांसह (Financial Change) झाली आहे. या बदलांचा परिणाम प्रत्येक घराच्या आणि प्रत्येकाच्या खिशावर होणार आहे. महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा चौफेर तडाखा बसला असून, गॅसपासून कारपर्यंत अनेक गोष्टी महाग झाल्या आहेत. विशेषतः मुंबईकरांना महागाईचा मोठा फटका बसला आहे. मुंबईत CNG-PNG चे दर वाढले असून दूधही महाग झाले आहे. चला जाणून घेऊया, १ सप्टेंबरपासून लागू झालेले हे पाच मोठे बदल (Rule Change From 1st September).

पहिला बदल : CNG चे दर वाढल्याने ऑटोचे भाडेही वाढले

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत राहणाऱ्या नागरिकांसाठी सप्टेंबर महिन्याची सुरुवात खिशावर अतिरिक्त भार टाकणारी ठरली आहे. एका बाजूला महानगर गॅस लिमिटेडने (MGL) CNG च्या किमतीत वाढ केली आहे, तर दुसरीकडे CNG च्या दरवाढीसोबतच टॅक्सी आणि ऑटोचे भाडेही वाढले आहे.

MGL ने CNG च्या दरात २ रुपये प्रति किलो वाढ केली आहे. या वाढीनंतर मुंबईत CNG ची किंमत आता ८८ रुपये प्रति किलो झाली आहे. दरम्यान, दिल्ली-NCR मध्ये गॅस पुरवठा करणाऱ्या इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने (IGL) देखील CNG च्या दरात ३.८९ रुपये प्रति किलो वाढ केली असून, नवीन किंमत ८६.९८ रुपये प्रति किलो झाली आहे.

दुसरा बदल : PNG चे दरही वाढले

सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी स्वयंपाकघराच्या बजेटवरही महागाईचा परिणाम झाला आहे. पाइप्ड नॅचरल गॅस म्हणजेच PNG च्या किमतीत वाढ करण्यात आली आहे.

ही दरवाढ मुंबईत करण्यात आली असून PNG च्या दरात १ रुपया प्रति SCM वाढ झाली आहे. त्यामुळे १ सप्टेंबर २०२६ पासून PNG ची नवीन किंमत ५३ रुपये प्रति SCM झाली आहे.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, सध्याच्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजाराशी संबंधित गॅसच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्याचा थेट परिणाम कंपनीच्या खर्चावर झाला आहे.

याशिवाय, अहवालांनुसार तेल कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक LPG सिलिंडरच्या किमतीतही ९.५० रुपयांची वाढ केली आहे.

दरम्यान, LPG e-KYC ची अंतिम मुदतही संपली आहे. ज्या ग्राहकांनी अद्याप आपल्या LPG कनेक्शनची e-KYC केलेली नाही, त्यांना पडताळणी पूर्ण होईपर्यंत घरगुती दराने LPG सिलिंडर मिळण्यात अडचणी येऊ शकतात.

यासाठीची अंतिम मुदत यापूर्वी अनेक वेळा वाढवण्यात आली होती. आधी १६ ऑगस्ट, त्यानंतर २३ ऑगस्ट आणि अखेरीस ३१ ऑगस्ट ही अंतिम तारीख देण्यात आली होती. आता ही मुदतही संपली आहे. मात्र e-KYC न केल्यामुळे तुमचे LPG कनेक्शन तात्काळ रद्द केले जाणार नाही. मात्र तुम्हाला सिलिंडर जास्त किमतीत खरेदी करावा लागू शकतो.

तिसरा बदल : कार खरेदी करणे महागणार

१ सप्टेंबरपासून कार खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांना झटका बसला आहे. महिन्याच्या पहिल्या दिवसापासून टाटा आणि ह्युंदाईच्या कार महाग होत आहेत. कंपन्यांनी याबाबत आधीच घोषणा केली होती.

अहवालांनुसार, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स लिमिटेडने १ सप्टेंबरपासून आपल्या सर्व व्हेरिएंटच्या कार आणि SUV च्या किमतीत २५ हजार रुपयांपर्यंत वाढ केली आहे.

त्याचवेळी ह्युंदाई मोटर इंडिया देखील यावर्षी आपल्या कारच्या किमतीत तिसऱ्यांदा वाढ करत आहे. त्यामुळे नवीन कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या बजेटवर अतिरिक्त भार पडणार आहे.

चौथा बदल : मुंबईत दूध महागले

सप्टेंबर महिना सुरू होताच मुंबईकरांसाठी दूध खरेदी करणेही महाग झाले आहे. मात्र ही दरवाढ पॅकेटमधील दुधाच्या किमतीत झालेली नसून तबेल्यातून थेट मिळणाऱ्या दुधाच्या दरात करण्यात आली आहे.

मुंबईत या दुधाच्या किमतीत ९ रुपये प्रति लिटर वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे १ सप्टेंबर २०२६ पासून तबेल्यातील दूध ९३ रुपयांऐवजी १०२ रुपये प्रति लिटर मिळणार आहे.

दूध व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार, पशुखाद्याच्या किमतीत सातत्याने होत असलेली वाढ तसेच इतर खर्च वाढल्यामुळे दुधाच्या दरात ही वाढ करण्यात आली आहे.

पाचवा बदल : परदेश प्रवास करणाऱ्या विमान प्रवाशांना दिलासा

१ सप्टेंबरपासून देशात एक दिलासादायक बदलही लागू झाला आहे. हा बदल परदेशात विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांशी संबंधित आहे. अहवालांनुसार, आता भारतातून परदेशात जाणाऱ्या प्रवाशांना इमिग्रेशन काउंटरवर बोर्डिंग पासवर शिक्का (स्टॅम्प) घेण्याची गरज भासणार नाही.

त्याऐवजी प्रवासी आपल्या मोबाईलमधील इलेक्ट्रॉनिक बोर्डिंग पास किंवा त्याची प्रिंटेड कॉपी दाखवून इमिग्रेशनची प्रक्रिया पूर्ण करू शकतील. यामुळे परदेश प्रवास करणाऱ्या विमान प्रवाशांची प्रक्रिया अधिक सोपी आणि सुलभ होण्यास मदत होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT