राष्ट्रीय

Rule Changes From November 1 : नियमांमधील बदलांचा होणार बँक खातेदारांपासून सरकारी कर्मचार्‍यांवर थेट परिणाम

बॅकिंग व्‍यवहारातील पारदर्शकतेबरेबरच निवृत्ती वेतन आणि डिजिटल आर्थिक व्‍यवहारांना मिळणार चालना

पुढारी वृत्तसेवा

Rule Changes From November 1

नवी दिल्ली : 1 नोव्हेंबर २०२५ पासूनच सामान्य नागरिक, बँक ग्राहक, क्रेडिट कार्डधारक आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अनेक महत्त्वाच्या वित्तीय नियमांमध्ये बदल होणार आहेत. हे बदल बँकिंग प्रणाली अधिक पारदर्शक बनवण्याबरोबरच निवृत्ती वेतन पेन्शन आणि डिजिटल व्यवहारांशी संबंधित ग्राहकांना अतिरिक्त सुविधा आणि वेळ देण्यासाठी करण्यात आले आहेत.चला, जाणून घेवूया १ नोव्हेंबरपासून नियमांमध्‍ये होणार्‍या बदलांविषयी...

बँक खात्यांमध्ये आता चार नॉमिनी करण्याची सुविधा

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, १ नोव्हेंबर २०२५ पासून बँकिंग कायदा (सुधारणा) अधिनियम, २०२५ च्या कलम १० ते १३ मधील तरतुदी लागू होतील. या नव्या नियमानुसार, बँक खातेधारक आता एकाऐवजी चार नॉमिनी (नामनिर्देशित व्यक्ती) नियुक्त करू शकतील. खातेधारक या चारही जणांना एकाच वेळी नामनिर्देशित करू शकतात किंवा त्यांना वारसा हक्काच्या क्रमानेही निश्चित करू शकतात. यामुळे खातेदाराच्या मृत्यूवेळी किंवा अनपेक्षित परिस्थितीत पैशांवर दावा करण्यासाठी होणारे वाद आणि विलंब मोठ्या प्रमाणात कमी करता येतील.

SBI कार्ड शुल्कात मोठा बदल

एसबीआय कार्डने आपल्या शुल्क रचनेत बदल जाहीर केले असून ते १ नोव्हेंबर २०२५ पासून लागू होतील. नवी शुल्क रचना काही विशिष्ट प्रकारच्या व्यवहारांवर लागू होईल – विशेषतः शिक्षणाशी संबंधित पेमेंट आणि वॉलेट लोडिंग व्यवहारांवर. आता CRED, Cheq, MobiKwik सारख्या थर्ड-पार्टी ॲप्सद्वारे केलेल्या शैक्षणिक शुल्काच्या भरणांवर १% शुल्क आकारले जाईल. शाळा, महाविद्यालय किंवा विद्यापीठाच्या वेबसाइटवर किंवा त्यांच्या 'पीओएस' (POS) मशीनवर थेट केलेल्या पेमेंटवर कोणतेही शुल्क लागणार नाही. याव्यतिरिक्त, ₹१,००० पेक्षा जास्त रकमेच्या प्रत्येक वॉलेट लोडिंग व्यवहारावर १% शुल्क लागू होईल.

जीवन प्रमाणपत्र जमा करण्याची प्रक्रिया सुरू

केंद्र आणि राज्य सरकारचे सर्व निवृत्तीवेतनधारक (Pensioners) यांच्यासाठी आपले वार्षिक जीवन प्रमाणपत्र (Life Certificate) १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२५ दरम्यान सादर करणे अनिवार्य आहे. हे प्रमाणपत्र निवृत्तीवेतनधारक जिवंत असल्याचे प्रमाणित करते आणि त्यांना पेन्शनचा पुढील हप्ता मिळत राहतो. ८० वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या पेन्शनर्ससाठी ही सुविधा यापूर्वीच १ ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे.

'एनपीएस'मधून 'यूपीएस'मध्ये स्‍थलांतरित अंतिम मुदत वाढवली

केंद्र सरकारने राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) मधून एकात्मिक पेन्शन योजना (Unified Pension Scheme – UPS) मध्ये स्थलांतरित होण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत वाढवली. ही मुदतवाढ सध्या कार्यरत कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी आणि एनपीएसच्या कक्षेत येणाऱ्या मृत कर्मचाऱ्यांच्या कायदेशीर जोडीदारांना (Legal Spouse) लागू असणार आहे.

पीएनबीने घटवले लॉकर भाड्याचे दर

पंजाब नॅशनल बँकेने (PNB) आपल्या लॉकर भाड्यामध्ये कपात जाहीर केली आहे. बँकेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार (१६ ऑक्टोबर २०२५), हे नवे दर वेबसाइटवर प्रकाशित झाल्याच्या ३० दिवसांनंतर, म्हणजेच नोव्हेंबरच्या मध्यापासून लागू होतील. सुधारित दरानुसार, सर्व क्षेत्रांतील आणि सर्व आकारांच्या लॉकरचे भाडे कमी करण्यात येणार असल्‍याने ग्राहकांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT