राष्ट्रीय

RSS | संघ पवित्र गंगेसारखा, परोपकारासाठी निरंतर प्रवाहित - उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त "RSS@100" या पुस्तकाचे प्रकाशन

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पवित्र गंगेसारखा आहे. गंगा ज्या प्रकारे परोपकारासाठी निरंतर प्रवाहित होते, त्याचप्रमाणे संघही निःस्वार्थ भावनेने समाजाच्या कल्याणासाठी कार्यरत आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त श्याम जाजू आणि अनुपम त्रिवेदी यांनी लिहिलेल्या "आरएसएस @ १००" या पुस्तकाचे प्रकाशन उपराष्ट्रपती भवनात राधाकृष्णन यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, दिल्ली विधानसभा अध्यक्ष विजेंद्र गुप्ता, इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राचे अध्यक्ष रामबहादूर राय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे क्षेत्र संघचालक पवन जिंदल, पुस्तकाचे सहलेखक श्याम जाजू आणि अनुपम त्रिवेदी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनी गेल्या शंभर वर्षांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सेवा, एकता आणि राष्ट्रीय चेतनेच्या आदर्शांना बळकटी दिली आहे. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त प्रकाशित झालेल्या या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात सहभागी होणे हा आपल्यासाठी वैयक्तिक अभिमानाचा विषय असल्याचे राधाकृष्णन यांनी सांगितले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आपला दीर्घकाळ संबंध राहिला असल्याचेही त्यांनी नमूद केले. संघाची वाटचाल ही भारताच्या सांस्कृतिक मुळांचा, वारशाचा आणि परंपरांचा पुनर्जागरण, सुदृढीकरण आणि पुनर्स्थापनेची वाटचाल आहे, असे उपराष्ट्रपती म्हणाले. पुस्तकाच्या शीर्षकातील ‘सेवा, एकता आणि त्याग’ या तीन मूल्यांचा उल्लेख करताना त्यांनी हीच मूल्ये स्वयंसेवकांच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत असल्याचे सांगितले. ‘सेवा’ समाजाप्रती निःस्वार्थ बांधिलकी दर्शवते, ‘एकता’ भारताच्या भाषिक आणि सांस्कृतिक विविधतेपलीकडे जाऊन बंध मजबूत करते, तर ‘त्याग’ हा कोणतीही स्थायी संस्था समर्पण, दृढता आणि निःस्वार्थ प्रयत्नांतूनच उभी राहते, याची आठवण करून देतो, असेही ते म्हणाले. 

संघाच्या शाखांमधून शिस्त, वेळेचे भान, शारीरिक तंदुरुस्ती, सांघिक भावना आणि समाज व राष्ट्राप्रती कर्तव्याची भावना विकसित केली जाते. शाखा ही तरुणांच्या ऊर्जेला राष्ट्रीय चारित्र्यात घडविणारी कार्यशाळा असल्याचे राधाकृष्णन यांनी सांगितले. संघाने भारताचा सांस्कृतिक वारसा, विविध परंपरा, भाषा आणि आध्यात्मिक चिंतन यांचा अभिमान जागवून सांस्कृतिक सातत्य आणि राष्ट्रीय चेतनेला चालना दिली आहे. समाजसेवेसाठी स्वतःला समर्पित करणाऱ्या लाखो स्वयंसेवकांच्या समर्पणाची आणि निष्ठेची दखल घेण्याची संधी म्हणून शताब्दी वर्षाकडे पाहिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

‘स्वयंसेवक ते प्रधानसेवक : मोदी युग’

पुस्तकातील ‘एक स्वयंसेवक से प्रधानमंत्री : मोदी युग’ या विशेष अध्यायाचा संदर्भ देत उपराष्ट्रपती म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्वयंसेवक ते प्रधानसेवक हा प्रवास या पुस्तकात मांडण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी यांनी ‘सेवा’ आणि ‘राष्ट्र प्रथम’ या तत्त्वांना सुशासनाच्या केंद्रस्थानी ठेवले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT