पुढारी ऑनलाईन डेस्क : बांगलादेशमध्ये सातत्याने अल्पसंख्याक आणि हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. आम्ही बांगलादेशातील मानवी हक्कांच्या उल्लंघनाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. बांगलादेशात अल्पसंख्याकांवरील हिंसाचाराचे कारण केवळ राजकीय नाही तर धार्मिक देखील आहे, असा दावा राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सह-सचिव अरुण कुमार यांनी आज (दि. २२) केला. दरम्यान, बंगळूरू येथे झालेल्या संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीत बांगलादेशचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. अल्पसंख्याकांवर, विशेषतः हिंदूंवर होत असलेल्या हिंसाचाराबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. ( Bangladesh Hindus Minorities)
सह-सचिव अरुण कुमार यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, आम्ही बांगलादेशातील हिंदू समुदायासोबत एकता व्यक्त करतो. आम्ही बांगलादेशातील मानवी हक्कांच्या उल्लंघनाबद्दल चिंता व्यक्त केली आहे आणि अल्पसंख्याकांसोबत एकता व्यक्त केली आहे. आपण असे मानू नये की या हिंसाचाराचे कारण केवळ सत्ता बदलामुळे राजकीय आहे तर त्याला धार्मिक कारणे देखील आहेत. अल्पसंख्याक आणि हिंदूंना सतत लक्ष्य केले जात आहे.बांगलादेशात अल्पसंख्याकांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होत आहे.
अरुण कुमार म्हणाले की, 'धार्मिक अल्पसंख्याकांवरील हिंसाचार नवीन नाही. १९५१ मध्ये बांगलादेशात हिंदू लोकसंख्या २२ टक्के होती, ती आता ७.९५ टक्के झाली आहे. ही मोठी घसरण आहे. यावेळी होत असलेल्या हिंसाचाराला सरकार आणि सरकारी संस्थांचाही पाठिंबा असल्याचे दिसून येते. तिथे भारतविरोधी भावना वाढत आहे. आम्ही आंतरराष्ट्रीय शक्तींबद्दलही चिंता व्यक्त केली आहे. भारत आणि त्याचे शेजारी देश हे केवळ देशांचा समूह नाहीत तर त्यांचा इतिहास सामायिक आहे. आपल्यात बरेच साम्य आहे. अनेक जागतिक शक्ती भारत आणि त्याच्या शेजारील देशांमध्ये अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा दावाही त्यांनी केला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तीन दिवसांची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा बेंगळुरूमध्ये सुरू आहे. ही संघाची महत्त्वाचे निर्णय घेणारी संस्था आहे. या बैठकीत बांगलादेश हिंसाचार तसेच मणिपूर, भाषा वाद आणि संघाच्या शताब्दी समारंभांबाबत ठराव मंजूर केले जाणार आहेत.
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीबद्दल बोलताना अरुण कुमार म्हणाले की, संघाच्या अंतर्गत ३२ हून अधिक संघटना काम करतात. प्रत्येक संस्था स्वतः स्वतंत्र असते. तिची निर्णय घेण्याची प्रक्रिया स्वतंत्र असते. प्रत्येक संस्थेचे स्वतःचे सदस्य असतात, निवडणुका असतात आणि त्यांची संपूर्ण प्रक्रिया वेगळी असते. भाजप आणि संघ यांच्यात कोणतेही मतभेद नाहीत. आम्ही देश आणि समाजासाठी एकत्र काम करतो. संघटनेची प्रक्रिया सुरू आहे आणि जिल्हा आणि राज्य पातळीवर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. भविष्यात भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी निवडणुका होतील, असेही अरुण कुमार यांनी स्पष्ट केले.