हर्षवर्धन सपकाळ. File Photo
राष्ट्रीय

Harshvardhan Sapkal | घोडबंदर-भाईंदर बोगदा, उन्नत मार्ग प्रकल्पात ३ हजार कोटींचा भ्रष्टाचार : हर्षवर्धन सपकाळ

मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदेंनी लाच घेतल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा गंभीर आरोप

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : घोडबंदर-भाईंदर बोगदा आणि उन्नत मार्ग प्रकल्पावरून सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सरकारला मोठी चपराक लगावली आहे. न्यायालयात सरकारचे पितळ उघडे पडल्याने निविदा रद्द करण्याची वेळ राज्य सरकारवर आली. या प्रकल्पात मोठे गौडबंगाल असून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शनिवारी केला.

यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३ हजार कोटी रुपयांची लाच घेतल्याचा गंभीर आरोप सपकाळ यांनी केला. नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ म्हणाले की, या प्रकल्पातून दुसऱ्या निविदाधारकाचे टेंडर तांत्रिक बाबीचे कारण देत रद्द केले. या कामाचे टेंडर ज्या कंपनीला दिली ती मेघा इंन्फ्रास्ट्रक्चर कंपनी कोणाची आहे? यामागे काय गौडबंगाल होते? हे आता सर्वांसमोर आले आहे.

एमएमआरडीएने आता टेंडर रद्द केल्याने हा विषय संपत नाही, हा विषय भ्रष्टाचाराचा आहे. राज्यात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी भ्रष्टाचाराचा कॉरिडॉर तयार केला असून एमएमआरडीए, म्हाडा, सिडको, एसआरए यांचे एक सर्कल आहे, असा आरोप त्यांनी केला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून भ्रष्टाचाराचे हे सर्कल सुरु आहे. यासाठी लाडके अधिकारी नियुक्त केले जातात आणि यातून लाडका ठेकेदार योजना राबविली जाते, असे ते म्हणाले.

राज्यातील सर्व मोठ्या प्रकल्पांची न्यायालयीन चौकशी करा : काँग्रेस

हा विषय केवळ एका प्रकल्पापुरता नसून राज्यात समृद्धी महामार्ग, पुणे रिंगरोड, विरार अलिबाग कॅारिडॅार आणि आता शक्तीपीठ महामार्ग हे सर्व प्रकल्प भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहेत. सत्तेतून संपत्ती आणि संपत्तीतून सत्ता हे दुष्टचक्र सुरु असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली. ठाणे, मुंबई परिसरातील प्रकल्प हे या गौडबंगालाचे भाग आहेत. ५० खोके एकदम ओकेचा पैसा यातूनच आला. निवडणुकीतही पैसा यातूनच आला होता, यांना सर्व रान मोकळे आहे. मुंबईसह राज्यातील महानगरपालिकांवर प्रशासक राज आहे आणि प्रशासक राज्य सरकार नियुक्त करतो. फडणवीस आणि शिंदे यांनी या माध्यमातून रॅकेट सुरु केले आहे. यातून तब्बल १ लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याचे दिसत आहे. म्हणून या सर्व प्रकल्पांची न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली.

'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने मराठी बासनात गुंडाळली'

शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री प्रताप सरकारनाईकांच्या विधानावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, सरनाईक भाजपाचा अजेंडा चालवत आहेत, त्यांना मराठी नेस्तनाबूत करायची आहे आणि हिंदी-हिंदूराष्ट्र करायचे आहे. त्याच अजेंड्याची री सरनाईकांनी ओढली आहे. एकनाथ शिंदे सुरतमार्गे गुवाहाटीला पळाले तेव्हाच या पक्षाने मराठी बासनात गुंडाळून ठेवली आहे, अशी टीका त्यांनी केली. सरकारने हिंदी सक्ती शब्द परत घेण्याची घोषणा केली पण अद्याप त्याचा शासन निर्णय निघालेला नाही. यांच्यावर कोणाचा दबाव आहे हे स्पष्ट असून महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री अमित शाह असून राज्यात कठपुतलीचा खेळ सुरु आहे, अशी खोचक टीका सपकाळ यांनी केली. मराठी आणि महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी काँग्रेस पक्ष कट्टीबद्ध आहे असे सपकाळ म्हणाले.

‘माणिकराव कोकाटे ढेकळ्या मंत्री’

‘कृषी मंत्रालय हे ओसाड गावची पाटीलकी आहे’ या माणिकराव कोकाटे यांच्या विधानावर बोलताना सपकाळ म्हणाले की, हे मंत्री आहेत का वाचाळवीर असे म्हणायची वेळ आली आहे. त्यांनी शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्याशी केली, आता त्यांनी जे विधान केले त्याचा अर्थ म्हणजे शेती राहिली नाही, उद्योगपतींची चाकरी करा असा आहे. हे कृषिमंत्री नाही तर ढेकळ्या मंत्री आहेत असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी लगावला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT