राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल, खासदार संजय सिंह, राजदचे खासदार मनोज झा यांची भेट घेतली.  X @RRPSpeaks
राष्ट्रीय

Ajit Pawar Accident Case | "अजित पवारांच्‍या विमान अपघात प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीसाठी संसदेत आवाज उठवावा"

रोहित पवारांची अरविंद केजरीवालांकडे मागणी, 'डीजीसीएमध्ये मोठे बदल करण्याची गरज'

पुढारी वृत्तसेवा

Ajit Pawar Accident Case

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आज (दि. ७) आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल, खासदार संजय सिंह, राजदचे खासदार मनोज झा यांची भेट घेतली. अजित पवार अपघात प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीसाठी संसदेमध्ये आवाज उठवण्याची मागणी यावेळी त्यांनी केली. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयामध्ये (डीजीसीए) मोठ्या बदलांची गरज असल्याची मागणी रोहित पवार यांनी केली. या मागणीला केजरीवाल यांनी सहमती दर्शवली असल्याचे भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना रोहित पवार यांनी सांगितले.

गुन्हा दाखल झाला नसल्याने केजरीवालांनी व्यक्त केले आश्चर्य

या वेळी रोहित पवारांनी सांगितले की, अजित पवार यांच्या अपघाताबद्दलची सर्व माहिती अरविंद केजरीवाल यांना दिली. त्यांनी संपूर्ण माहिती समजून घेतली. यानंतर चर्चा झाल्याचे ते म्हणाले. अद्याप या प्रकरणात एफआयआर दाखल झाला नसल्याने केजरीवाल यांनी आश्चर्य व्यक्त केले. राम मोहन नायडू यांचा राजीनामा झाला पाहिजे, यासाठी केजरीवाल यांच्यासोबत चर्चा केली असल्याचे ते म्हणाले.

संसदेत आवाज उठविण्‍यासाठी केली विनंती

महाराष्ट्रात इतक्या मोठ्या नेत्याला न्याय मिळत नाही. म्हणून संसदेच्या अधिवेशनात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या पक्षांच्या नेत्यांची भेट घेत आम्ही हा मुद्दा सभागृहात उचलला जावा यासाठी विनंती केली. अजित पवार यांना न्याय मिळावा म्हणून तुम्ही जे काम करत आहात त्याला आम्ही साथ देऊ, असे केजरीवाल यांनी म्हटले असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.

'राहुल गांधींसह इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटणार'

अजित पवार यांच्या अपघाताच्या चौकशी संदर्भात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीतील पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेणार असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. १० मार्च रोजी राहुल गांधींची भेट होऊ शकते. तसेच समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, झारखंड मुक्ति मोर्चाचे हेमंत सोरेन, तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी, द्रमुकच्या के. कनिमोळी यांच्या भेटी घेणार असल्याचे ते म्हणाले.

'व्हीएसआर कंपनी आणि चंद्राबाबू नायडू यांचे संबंध'

व्हीएसआर विमान कंपनी आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा थेट संबंध असल्याचा पुनरुच्चार रोहित पवार यांनी केला. आंध्र प्रदेशमध्ये जाऊन यासंबंधी पुरावे दाखवायला तयार आहे, या विषयावर आमने-सामने चर्चा करायला तयार आहे, असे आव्हान त्यांनी दिले. केंद्रीय मंत्री राम मोहन नायडू यांच्या कार्यालयात समोर बसून चर्चा करायला तयार असल्याचे ते म्हणाले. मी थेट बोलत आहे; मात्र ते सूत्रांच्या हवाल्याने बोलत आहेत, असे रोहित पवार म्हणाले. बडे लोक व्हीएसआरच्या पाठीमागे आहेत, म्हणून कंपनीचा मालक व्ही. के. सिंग यांना वाचवले जात असल्याचा आरोपाचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT