पुढारी ऑनलाईन डेस्क : हरियाणातील शिकोपूर कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणात आज रॉबर्ट वधेरा यांची पुन्हा चौकशी केली जात आहे. ते सलग दुसऱ्या दिवशी ईडी कार्यालयात पोहोचले आहेत. रॉबर्ट वधेरा आज त्यांच्या पत्नी आणि काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांच्यासोबत ईडी कार्यालयात पोहोचले आहेत.
सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) मंगळवारी रॉबर्ट वधेरा यांची चौकशी केली. या प्रकरणात रॉबर्ट वधेरा यांना ८ एप्रिल रोजी पहिल्यांदा समन्स बजावण्यात आले होते. हरियाणातील शिकोहपूर येथील एका जमीन व्यवहाराशी संबंधित हे प्रकरण आहे. ईडीच्या चौकशीवर रॉबर्ट वधेरा म्हणाले की, "आम्ही कोणालाही घाबरत नाही. राजकीय सूडबुद्धीचा भाग म्हणून आमच्यावर कारवाई केली जात आहे. हा सगळा वेळेचा खेळ आहे, वेळ बदलेल. पुढे ते म्हणाले की, मी देश सोडून पळून जाणार नाही. तुम्ही कितीही एजन्सीचा वापर करा. मी सर्व प्रश्नांची उत्तरे देईन. हरियाणामध्ये जेव्हा या प्रकरणाची चौकशी करण्यात आली तेव्हा प्रशासनाला काहीही चुकीचे आढळले नाही. मला त्याच प्रकरणात क्लीन चिट मिळाली. ७ वर्षांनंतर माझी पुन्हा चौकशी का केली जात आहे, हे मला समजत नाही, असे वधेरा म्हणाले.