पुढारी ऑनलाईन डेस्क
सध्या संपूर्ण जग कोरोना महामारीचा सामाना करत आहे. संबंधित व्यक्तीला कोरोनावरील उपचार करण्यासाठी होणारा खर्च सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचा असू शकतो. मग, अशा कोरोनासंदर्भात मेडिक्लेम आहेत का? किंवा आपण वैयक्तिक पाॅलिसीज घेऊ शकतो का? घेऊ शकत असू तर, त्यासाठी प्रिमियम काय आहे? सर्वच गोष्टींसंर्दभात चार्टर्ड अकाउंटंट गिरीश कुलकर्णी यांच्यासोबत पुढारी प्रतिनिधी पूर्वा कोडोलीकर यांनी साधलेला संवाद…
कोरोनासाठी मेडिक्लेम पाॅलिसीज उपलब्ध आहेत का?
नक्कीच आहेत. मागील वर्षी म्हणजे कोरोनाची सुरूवात जेव्हा भारतामध्ये झाली, त्यावेळी भारत सरकारने अर्थात इन्शुरन्स रेग्युलेशन आणि डेव्हलपमेंट ऑफ ऑथेरिटी ऑफ इंडियाने (आयआरडीए) प्रत्येक जनरल इन्शुरन्स कंपनीला दोन प्राॅडक्स लाॅन्च करण्यासाठी सांगितले. त्यातील एक 'कोरोना कवच' आणि दुसरा 'कोरोना रक्षक'. तर, सर्व इन्शुरन्स कंपनीने या दोन पाॅलिसीज लाॅन्च केलेल्या आहेत. त्याचबरोबर सर्वसाधारण मेडिक्लेममध्ये कोरोनाचे क्लेम केले जाऊ शकतात. तर, दोन्हीकडून क्लेम केले जातात.
दोन पाॅलिसीज वैयक्तिक आहेत की, संपूर्ण कुटुंबासाठी?
यामध्ये वैयक्तिक आणि कुटुंबासाठी पाॅलिसीज घेऊ शकतो म्हणजेच दोन्हीही पर्याय उपलब्ध आहेत. आम्ही सल्ला देताना कुटुंबासाठी पाॅलिसीज घेण्याचा सल्ला देतो. कारण, कोरोना हा संसर्गजन्य आहे. म्हणजे एका व्यक्तीला झाला तर, कुटुंबातील सदस्यांनादेखील होण्याची शक्यता असते. त्यामुळे एका व्यक्तीसाठी पाॅलिसी घेण्यापेक्षा संपूर्ण कुटुंबासाठी पाॅलिसीज घ्यावी.
या पाॅलिसीजमध्ये कव्हर काय असतो?
वैयक्तिक विचार केला तर, साधारण १ लाखापासून ५ लाखांपर्यंत कव्हर असतो. कुटुंबाचा विचार केला तर ३ लाखांपासून ५ लाखांपर्यंत कव्हर करण्याचा सल्ला दिला जातो. यामध्ये आपली राहणीमान आहे, याचा विचार करून योग्य ते कव्हर घ्यावं.
पाॅलिसीजसाठी प्रिमियम किती असतो?
कोरोना कवच आणि कोरोना रक्षक, या दोन पाॅलिसींचा कमाल कालावधी हा साडेनऊ महिन्यांचा आहे. यामध्ये साधारण १ लाखाची पाॅलिसी घेतली, तर १००० रुपयांचा प्रिमियम येणार. तो एकदाच भरावा लागणार आहे, तर २८५ दिवसांसाठी तुमचं ते कव्हर व्हॅलीड राहणार आहे. तसेच ५ लाखांची पाॅलिसी घेतली एकदाच साधारण २७०० रुपयांचा प्रिमियम भरावा लागणार आहेत. तर, २८५ दिवसांसाठीदेखील तुमचा कव्हर व्हॅलीड राहणार आहे. ही रक्कम जीएसटी समाविष्ट करून आलेली आहे.
या पाॅलिजीस घेणं आवश्यक आहेत का?
नक्कीच. अशाप्रकारच्या पाॅलिजीस असणं आवश्यक आहे. आपली बॅंकेतील शिल्लक रक्कम किंवा केलेली गुंतवणूक मोडून रुग्णालयातील खर्च करण्यात यावा, असं कुणालाही वाटत नाही. त्यामुळे अशा पाॅलिसीज असणं आवश्यक आहेत. कारण, अशा पाॅलिसीज घेतल्यामुळे शिल्लक पैसा किंवा गुंतवणूतील पैशाला धक्का लागत नाही. आजच्या काळात अशा पाॅलिसीज घेणं महत्वाचं आहे.
पाॅलिसीज घेण्यासाठी कोणती काळजी घ्यावी?
जेव्हा आपण तंदुरुस्त असता तेव्हा पाॅलिसी घ्यावी. तुम्ही योग्य ते कव्हर घ्यावं. पाॅलिसी घेताना संबंधित इन्शुरन्स कंपनीची विश्वासाहर्ता तपासावी, यासाठी तुम्ही इंटरनेटवर जाऊ ते पाहू शकता. कॅशलेसचा व्यवहार करताना संबंधित रुग्णालय आणि इन्शुरन्स कंपनी, याचा थोडा अभ्यास करून पाॅलिसी घ्याव्यात. या सर्व बाबींचा विचार करून योग्य तो प्लॅन घ्यावा.
साधारण मेडिक्लेम आणि कोरोना मेडिक्लेम यात फरक काय?
कोरोनासंबंधातील मेडिक्लेम हा फक्त कोरोना रोगासंदर्भात करता येतो. त्यामध्ये कोव्हिड हाॅस्पिटल आणि त्यांचा उपचार खर्च कव्हर होतो. याची प्रिमियम रक्कम कमी असते आणि कालावधीही कमी असतो. साधारण मेडिक्लेम कोणत्याही आजारावरील उपचार किंवा अपघात झाल्यानंतर त्यावरील उपचार, यासंदर्भात घेता येतात. त्याला कोणतंही हाॅस्पिटल असू शकतं. विशेष हे की साधारण मेडिक्लेममध्ये कोरोनासंदर्भात क्लेम करता येतो. यामध्ये प्रिमियमची रक्कम थोडी जास्त असते आणि आयुष्यभर प्रिमियम भरावा लागतो.