File Photo
राष्ट्रीय

RG Kar Rape case : देशभर आंदोलन आणि शिक्षेनंतरही प्रश्नचिन्ह

वेश्यागमन अन् पोर्न क्लिप; संजय रॉयचे कारनामे उघड

पुढारी वृत्तसेवा

कोलकाता : कोलकाता येथील आर. जी. कार रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार झाला त्यावेळी आपल्या मित्रांसोबत संजय रॉय वेश्यावस्तीत गेला होता. मात्र, तेथे त्याने काही केले नव्हते. त्यावेळी जाताना त्याने रस्त्यात एका मुलीचा विनयभंग केला होता, असे त्याच्या लाय डिटेक्टर टेस्टमध्ये त्याने सांगितले होते, अशी माहिती सीबीआय अधिकार्‍यांनी दिली. नंतर चार वाजून तीन मिनिटांनी तो रुग्णालयात आला. तेथून तो सेमिनार हॉलच्या कॉरिडोरमध्ये आला. त्यावेळी त्याने प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार केल्याचा गंभीर गुन्हा केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

सीबीआयने काहीच केले नाही; पीडितेच्या वडिलांचा आरोप

या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने काहीही केले नाही, असा आरोप आर. जी. कार रुग्णालयातील बलात्कार आणि खून प्रकरणातील विद्यार्थिनीच्या पालकांनी केला. त्यामुळे आरोपीला दोषी ठरवून समाधानी होण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही उच्च आणि सर्वोच्च न्यायालयापुढे अनेक प्रश्न उपस्थित केले होते. आम्हाला त्याची उत्तरे न्यायालयाकडून अपेक्षित होती. त्यांनी सीबीआयकडे सारे उत्तरदायित्व दिले, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

आणखी आरोपी असावेत; केंद्रीय मंत्र्यांचा आरोप

कोलकाता : या गुन्ह्यात एकापेक्षा अधिक लोकांचा सहभाग असावा आणि पुराव्यात हेरफार झाली असण्याचा संशय अनेक जण व्यक्त करत आहेत. न्यायालयाने त्याला दोषी ठरवले आहे; पण या घृणास्पद गुन्ह्यात एकापेक्षा अधिक जण सहभागी असावेत, असा प. बंगाल नागरिकांचा विश्वास आहे. कोलकाता पोलिसांनी पाच दिवस या प्रकरणाचा तपास केला. त्या काळात पुराव्यांमध्ये फेरफार केली असण्याची शक्यता आहे. कडक शिक्षा केली जावी. आर. जी. कार रुग्णालयातील घटनेने प. बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती चांगली नसल्याचे स्पष्ट होते, असे केंद्रीय मंत्री सुकांता मुजुमदार यांनी म्हटले आहे.

मला गुंतवण्यात आलेय, यात तर आयपीएस गुंतलाय

कोलकाता : मला या प्रकरणात गुंतवण्यात आलेय. या प्रकरणात एका भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकार्‍याचा सहभाग आहे, असा आरोप या प्रकरणात दोषी ठरवलेल्या संजय रॉय याने केला. मला चुकीच्या पद्धतीने गुंतवण्यात आले आहे. मी हे केले नाही. ज्यांनी हे केले ते मोकाट आहेत, असा कांगावा त्याने न्यायालयाच्या आवारात केला.

घटनाक्रम

9 ऑगस्ट 2024 : रुग्णालयाच्याा चौथ्या मजल्यावरील सेमिनार हॉलमध्ये एका 31 वर्षीय ज्युनिअर डॉक्टरचा मृतदेह सापडला. तिला बाह्य 16, तर अंतर्गत नऊ जखमा झाल्या होत्या. बलात्कारानंतर तिची गळा दाबून हत्या केल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले.

10 ऑगस्ट 2024 : वाहतूक पोलिस स्वयंसेवक असणार्‍या संजय रॉयला अटक. वैद्यकीय कर्मचार्‍यांची आक्रमक मोहीम.

12 ऑगस्ट 2024 : हॉस्पिटलचे प्रमुख संदीप घोष बडतर्फ. डॉक्टरांचा देशव्यापी संप.

13 ऑगस्ट 2024 : पीडितेचे कुटुंबीय आणि अन्य काहीजणांची कोलकाता उच्च न्यायालयात धाव.

14 ऑगस्ट 2024 : संजय रॉय कोलकाता पोलिसांकडून सीबीआयच्या ताब्यात.

15 ऑगस्ट 2024 : देशभर रात्री मेणबत्ती मोर्चे काढत महिलांच्या सुरक्षिततेची मागणी.

17 ऑगस्ट : आयएएमचा देशव्यापी डॉक्टरांचा संप.

20 ऑगस्ट : सर्वोच्च न्यायालयाकडून स्वत:हून प्रकरणाची दखल. वैद्यकीय व्यावसायिकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजनांसाठी 10 सदस्यीय टास्क फोर्स स्थापन.

28 ऑगस्ट : पोलिसांचे संदीप घोषसह रुग्णालयाशी संबंधितांच्या निवासस्थानावर छापे. सप्टेंबरच्या मध्यात घोषला पुराव्यात छेडछाड केल्याच्या आरोपावरून अटक. एफआयआर नोंदवण्यात उशीर केल्याबद्दल ताला पोलिस ठाण्याच्या प्रमुखाला अटक करण्यात आली.

18 जानेवारी 2025 : संजय रॉय दोषी सीबीआय तपासावर डॉक्टरांचे प्रश्नचिन्ह

सीबीआय तपासावर डॉक्टरांचे प्रश्नचिन्ह

कोलकाता : आर. जी. कर शासकीय रुग्णालयात कनिष्ठ डॉक्टरवर बलात्कार करून हत्या करण्याच्या प्रकरणात एका आरोपीला दोषी ठरवले असले तरी रुग्णालयातील डॉक्टर मात्र यावर समाधानी नाहीत त्यांनी सीबीआयच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

या गुन्ह्यात एकापेक्षा अधिक जण आहेत. त्या दृष्टीने तपास का झाला नाही? संजय रॉय हा गुन्ह्यातील मुख्य आरोपीआहे. पण, एकट्याने त्याने हे कृत्य करणे शक्य नाही. सीबीआयने त्यांच्या प्राथमिक आरोपपत्रात पुराव्यात फेरफाराचा आरोप केला आहे. त्याचे काय झाले? त्यात काय कारवाई केली? माजी प्राचार्य संदीप घोष याला या प्रकरणातून पूर्ण मुक्त केले आहे का? पुरवणी आरोपपत्र का दाखल केले नाही? संजय रॉयशिवाय या गुन्ह्यात कोण सहभागीआहे? याची माहिती मिळाली पाहिजे. आमचे त्यासाठीचे आंदोलन सुरूच राहील, असे सवाल ज्यनिअर डॉक्टरांच्या आंदोलनाचे नेतृत्व करणार्‍या डॉ. अनिकेत महातो यांनी उपस्थित केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT