नक्षलवादाच्या संपूर्ण उच्चाटनासाठी केंद्राची आढावा बैठक Pudhari Photo
राष्ट्रीय

नक्षलवादाच्या संपूर्ण उच्चाटनासाठी केंद्राची आढावा बैठक

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : केंद्र सरकार नक्षलवाद्यांना संपविण्यासाठी प्रयत्न करत आहे. छत्तीसगडमध्ये २४ तासांत ३१ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली नक्षलवाद प्रभावित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे. ७ ऑक्टोबर रोजी विज्ञान भवन, दिल्ली येथे ही बैठक होणार आहे. त्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ८ राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत.

केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगड, झारखंड, तेलंगणा, ओडिशा, आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री या आढावा बैठकीत सहभागी होणार आहेत. नक्षलवाद प्रभावित राज्यांना सहाय्य प्रदान करणाऱ्या पाच केंद्रीय मंत्रालयांचे मंत्री देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, केंद्र, राज्ये आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी देखील या चर्चेत सहभागी होतील. केंद्र सरकारने मार्च २०२६ पर्यंत नक्षलवादाचे संपूर्ण उच्चाटन करण्याचे लक्ष ठेवले असल्याचे गृह मंत्रालयाने सांगितले.

दरम्यान, या अगोदर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी ६ ऑक्टोबर २०२३ रोजी नक्षलवाद प्रभावित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत आढावा बैठक घेतली होती. त्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्र्यांनी नक्षलवाद विरोधी लढण्यासाठी सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे दिली होती. मोदी सरकारच्या रणनीतीमुळे, २०१० च्या तुलनेत २०२३ मध्ये नक्षलवाद्यांच्या हिंसाचारात ७२ टक्क्यांनी घट झाली आहे. तर मृत्यूदर ८६ टक्क्यांनी कमी झाला आहे. आता देशातील नक्षलवादाविरोधात शेवटची लढाई सुरु असल्याचे मंत्रालयाने सांगितले. २०२४ मध्ये आतापर्यंत, सुरक्षा दलांनी सशस्त्र नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात अभूतपूर्व यश मिळविले आहे. या वर्षात आतापर्यंत २०२ नक्षलवाद्यंचा खात्मा करण्यात आला आहे. तर ७२३ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. तसेच ८१२ जणांना अटक करण्यात आली असल्याचे गृह मंत्रालयाने सांगितले. २०२४ मध्ये नक्षलवादाने प्रभावित असलेल्या देशभरातील जिल्ह्यांची संख्या कमी होऊन केवळ ३८ वर आली असल्याचेही मंत्रालयाने सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT