राष्ट्रीय

Retail Inflation: किरकोळ महागाईचा दर मार्चमध्ये ३.४० टक्क्यांवर; तूर डाळ, बटाटा आणि कांदा स्वस्त, तरीही खिशाला कात्री कोठे?

retail inflation March 2026 | अन्नपदार्थांच्या किमती वाढण्याचा दर ३.८७ टक्के

पुढारी वृत्तसेवा

retail inflation March 2026

नवी दिल्ली : फेब्रुवारीतील ३.२१ टक्क्यांच्या तुलनेत मार्च महिन्यात किरकोळ महागाई दरात (Retail Inflation) किंचित वाढ होऊन तो ३.४ टक्क्यांवर पोहोचला आहे. केंद्र सरकारने आज (दि. १३) यासंदर्भातील अधिकृत आकडेवारी जाहीर केली. ग्राहक किंमत निर्देशांकाच्या (CPI) आकडेवारीनुसार, मार्चमध्ये अन्नपदार्थांच्या किमती वाढण्याचा दर ३.८७ टक्के राहिला, मागील महिन्यात ३.४७ टक्के होता. ग्रामीण भागातील महागाई ३.६३ टक्के, तर शहरी भागासाठी हा दर ३.११ टक्के नोंदवण्यात आला आहे. मात्र, महागाईचा हा दर अद्याप ४ टक्क्यांच्या सुसह्य मर्यादेपेक्षा कमी असल्याने सध्या तरी चिंतेचे कारण नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

ग्रामीण आणि शहरी भागातील तफावत

आकडेवारीनुसार, शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागात महागाईचा दबाव किंचित जास्त आहे. ग्रामीण भागात किरकोळ महागाई ३.६३ टक्के इतकी नोंदवण्यात आली, तर शहरी भागात ती ३.११ टक्क्यांच्या निचांकी स्तरावर आहे. ही तफावत गाव आणि शहरांमधील वस्तूंच्या किमतींमधील फरक स्पष्ट करते.

अन्नधान्य महागले, पण घरांचे भाडे स्थिर

घरगुती बजेटमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अन्नपदार्थांच्या किमतीत थोडी वाढ झाली आहे.अखिल भारतीय ग्राहक अन्न मूल्य निर्देशांक (CFPI) मार्चमध्ये ३.८७ टक्के (तात्पुरता) नोंदवण्यात आला, जो फेब्रुवारीत ३.४७ टक्के होता. येथेही ग्रामीण भागातील अन्न महागाई (३.९६ टक्के) शहरांच्या (३.७१ टक्के) तुलनेत अधिक राहिली आहे.

गृहनिर्माण क्षेत्रातील महागाई २.११ टक्क्यांच्या निम्न स्तरावर

गृहनिर्माण क्षेत्रातील महागाई २.११ टक्क्यांच्या निम्न स्तरावर राहिली आहे. शहरी भागात हा दर १.९५ टक्के, तर ग्रामीण भागात २.५४ टक्के होता. यामुळे घरभाडे किंवा घराशी संबंधित खर्चाचा ग्राहकांवर सध्या तरी मोठा बोजा पडलेला नाही.

काही वस्तूंनी दिलासा दिला तर काही क्षेत्रात दरवाढ कायम

मार्च महिन्याच्या आकडेवारीनुसार स्वयंपाकघरातील काही मुख्य वस्तूंनी दिलासा दिला आहे, तर काही क्षेत्रांत दरवाढ कायम आहे.

भाज्या आणि कडधान्ये: कांदा आणि बटाटा यांसारख्या रोजच्या वापरातील भाज्यांच्या किमतीत घट झाली आहे. याशिवाय लसूण, तूर डाळ आणि मटार यांसारख्या वस्तूंनी 'नकारात्मक महागाई' नोंदवली आहे, म्हणजेच गेल्या वर्षाच्या तुलनेत त्यांच्या किमती कमी झाल्या आहेत. मात्र, दुसरीकडे नारळ, टोमॅटो आणि फ्लॉवरच्या किमतीत मोठी वाढ दिसून आली आहे.

दागिने: सोन्या-चांदीच्या बाजारात मात्र तेजी कायम आहे. चांदीच्या दागिन्यांच्या किमतीत फेब्रुवारीच्या तुलनेत किरकोळ घसरण झाली असली, तरी सोने, हिरे आणि प्लॅटिनमच्या दागिन्यांच्या किमतीत मोठी वाढ सुरूच आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT